

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आलेली पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर (Seema Haider) हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सीमा हैदरला पुन्हा एकदा ताब्यात घेतले आहे.तिच्या फोन कॉल डिटेल्सचीही छाननी केली जात आहे. तिने दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळल्यामुळे तिला पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सचिन मीणाबरोबर ऑनलाईन गेम PUJB खेळताना सीमाची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. सीमा ही सचिन मीणा याला भेटण्यासाठी आपल्या चार मुलांसह नेपाळमार्ग भारतात आली. मात्र हा संपूर्ण प्रकारच संशयास्पद असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी याची सखोल चौकशी सुरु केली होती. यानंतर गुप्तचर विभागासह दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केली. सोमवार १७ जुलै रोजी एटीएसने सीमा हैदर आणि तिचा कथित पती सचिन यांना ग्रेटर नोएडातील रबुपुरा गावातून ताब्यात घेतले. दोघांची सहा तास स्वतंत्रपणे चौकशी केली. सीमाचे फोन कॉल डिटेल्स, पाकिस्तानातून दुबई, नंतर काठमांडू आणि तेथून ग्रेटर नोएडापर्यंत पोहोचण्याची गोष्ट तपासली जात आहे.
सीमाच्या नातेवाईकांचे पाकिस्तानी लष्कराशी असलेले संबंध उघड झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले आहे. सीमाचे काका पाकिस्तानी लष्करात सुभेदार असल्याचे समोर आले आहे. याशिवाय सीमाचा भाऊही पाकिस्तानी लष्करात आहे. अशा परिस्थितीत सीमा हैदरचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी यूपी एटीएसची चौकशी सुरू आहे. यूपी एटीएसचे पथक साध्या गणवेशात सचिनच्या राबुपुरा येथील निवासस्थानी पोहोचले. तिला ताब्यात घेण्यात आले आहे.
सीमा हैदरला यूपी एटीएसच्या ताब्यात घेतल्यानंतर सचिन मीनाच्या घरात शांतता आहे. कुटुंबीयांनी घराचे दरवाजे बंद केले आहेत. घरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. सचिनचे कुटुंब सीमा हैदरबाबत चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले होते. सीमासोबत सचिनही मीडियासमोर प्रश्नांची उत्तरे देत होता. यूपी एटीएसची कारवाई होताच. कुटुंबीयांनी चर्चा टाळली आहे.
सीमा हैदर प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी पाकिस्तानी महिलेच्या तपासाला गती दिली आहे. पाकिस्तानातही या मुद्द्यावरून खळबळ उडाली आहे. कट्टरपंथी शक्ती सीमा हैदरचा शिरच्छेद करण्याच्या धमक्या देत आहेत. दरम्यान, तपास यंत्रणांनी सीमा हैदरचे ओळखपत्र उच्चायुक्तालयाकडे पाठवल्याचे वृत्त आहे. सीमा हैदरचे पाकिस्तानमध्ये नेमकं कोठे वास्तव्य होते, याचा तपास केला जात आहे.
पोलीस तपासामध्ये सीमाकडे दोन वेगवेगळे पासपोर्ट असल्याचे आढळले. तसेच तिच्याकडे चार स्मार्ट फोन असल्याचेही निदर्शनास आले. तसेच तिचा भाऊ पाकिस्तानी लष्करात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. दरम्यान दैनिक 'भास्कर'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, सीमाला उत्तर प्रदेश पोलिसांनी १४ दिवसांपूर्वी प्रथम अटक केली होती. मात्र आतापर्यंत पोलिस तिचे मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू शकलेले नाहीत.
या प्रकरणी तपास करणारे रबुपुरा पोलिस स्टेशनचे प्रभारी सुधीर कुमार आणि जेवर पोलिस स्टेशनचे प्रभारी मनोज कुमार सिंह यांनी दैनिक 'भास्कर'ला सांगितले की, यापूर्वी हे प्रकरण रबुपुरा पोलिस ठाण्यात होते. सीमाच्या सुटकेपूर्वी म्हणजेच ७ जुलैरोजी उच्चस्तरीय तपासासाठी हे प्रकरण ग्रेटर नोएडातील जेवर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपी-एटीएस पाकिस्तानातून भारतात येताना सीमा कोणाला भेटली आणि तिला कोणी मदत केली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सीमा हैदर तिच्या सिममधून कोणाशी बोलली? त्याच्याकडे किती मोबाईल फोन आणि मोबाईल नंबर आहेत.सध्या उत्तर प्रदेश पोलीस, एटीएस आणि गुप्तचरविभागाला सीमाने रचलेल्या कथेवर शंका व्यक्त करत आहेत.
सीमा हैदरला पोलिसांनी सर्वप्रथम ४ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. ती आपली ओळख न सांगता सुमारे दीड महिने सचिनची पत्नी म्हणून राबुपुरा गावात राहत होती. कोर्ट मॅरेजसाठी त्याने वकिलाशी संपर्क साधला असता प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. सीमा, सचिन आणि सचिनचे वडील नेत्रपाल यांना ४ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. रबुपुरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सीमेवरून अनेक कागदपत्रे आणि मोबाईल जप्त केले आहेत.