

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप 2022 च्या सुपर 4 फेरीच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर ५ गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय होता. यानंतर पाकिस्तानला फक्त १२१ धावांवर रोखण्यात श्रीलंकेला यश आले. यानंतर पथुम निसांका याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने हा विजय मिळवला. पथुम निसांकाने नाबाद ४८ चेंडूमध्ये ५५ धावा केल्या.
श्रीलंकेकडून फिरकीपटू वनिंदू हसरंगाने ४ षटकांमध्ये २१ धावा देत ३ बळी घेतले. तर दासुन शनाका, प्रमोद मदुशन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. पाकिस्तानकडून कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. बाबर आझमने २९ चेंडूमध्ये ३० धावांची खेळी करत पाकिस्तानचा डाव सावरला. बाबर आझम केलेल्या ३० धावांच्या बळावर पाकिस्तानला १२१ धावा करता आल्या. पथुम निसांका केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर १२१ धावांचे लक्ष्य ३ षटक शिल्लक ठेवून पार केले.