

इस्लामाबाद, पुढारी ऑनलाईन : Pakistan bans Holi : पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार कोणापासून लपलेले नाहीत. या देशात हिंदूंना त्यांचे सण उघडपणे साजरे करण्याचेही स्वातंत्र्यही नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाचा (एचईसी) निर्णय. ज्याअंतर्गत पाकिस्तानातील सर्व विद्यापीठांमध्ये होळीच्या सणावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान सरकारवर जोरदार टीका होत आहे.
इस्लामाबादच्या कायदे-ए-आझम विद्यापीठात 12 जून रोजी होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो विद्यार्थी होळी खेळतानाचा एक व्हिडिओ अलीकडेच व्हायरल झाला होता. यावरून संपूर्ण पाकिस्तानात गदारोळ झाला. वास्तविक, रंगांचा हा सुंदर सण साधारणपणे मार्चमध्ये साजरा केला जायचा, मात्र यंदा विद्यापीठ बंद असल्याने तो जूनमध्ये साजरा करण्यात आला. येथे शिकणारे सर्व धर्माचे विद्यार्थी एकत्र येऊन होळी साजरी करताना दिसले. (Pakistan bans Holi)
मात्र, यानंतर पाकिस्तानातील राजकीय वातावरण तापले. अनेक कट्टरपंथींनी या व्हिडिओवर टीका केली. पाकिस्तानात सरकार कोणत्याही पक्षाचे असो त्यांना कट्टरवाद्यांच्या दबावापुढे झुकावे लागते. त्यामुळे सध्याच्या सत्ताधा-यांनी थेट होळी सणावरच बंदी घालण्याचे आदेश पारीत केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये होळी साजरी करण्यावर बंदी घातली आहे. असे उपक्रम देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांपेक्षा पूर्णपणे भिन्न असल्याचे आयोगाने अधिसूचनेत आयोगाने नमूद केले आहे. (Pakistan bans Holi)
आदेशात म्हटले आहे की, 'कॉलेज कॅम्पसमध्ये इस्लामिक मूल्यांच्या विरोधातील अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत. हे अतिशय दुःखद आहे. नुकतेच पाकिस्तानातील विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर होळी सण साजरा करण्यात आला. या उत्सवामुळे देशाची प्रतिमा खराब होत आहे. त्यामुळे या होळी सण यापुढे साजरा करण्यास मनाई असून त्यावर बंदी घालण्यात येत आहे, अशी घोषणा करण्यात येत आहे.' (Pakistan bans Holi)