अपघात रोखण्यासाठी रेल्वेचा पुढाकार

अपघात रोखण्यासाठी रेल्वेचा पुढाकार
Published on
Updated on

अनेक समस्यांवर मात करत भारतीय रेल्वे जागतिक रेल्वे नेटवर्कच्या दिशेने पाऊल टाकत आहे. अमृतमहोत्सवी वर्षादरम्यान शताब्दी ट्रेनपेक्षाही आधुनिक व वेगवान अशा एकूण 75 'वंदे भारत ट्रेन' पूर्ण देशभरात विविध मार्गांवर धावत आहेत. रेल्वेअपघातांचे एकमात्र कारण म्हणजे देशभरातील रेल्वेमार्ग पूर्णपणे उघडे आहेत. हे रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करणे जनावरे आणि माणसांनाही सहज शक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन आता रेल्वे मंत्रालयाने एक विशेष प्रकारच्या सुरक्षा भिंतीच्या डिझाईनला मान्यता दिली आहे.

भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगातील सर्वात मोठ्या पाच नेटवर्कपैकी चौथ्या क्रमांकाचे आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारतीय रेल्वे नेटवर्कचा क्रमांक लागतो. तर पाचव्या क्रमांकावर कॅनडा रेल्वे आहे. या देशांप्रमाणेच भारतीय रेल्वे व्यवस्थापनही आधुनिकीकरण, विकास व काळानुरूप बदलाच्या मार्गाने वेगाने पुढे जात आहे. भारतीय रेल्वे पूर्ण देशात मीटरगेज नेटवर्कला ब्रॉडगेजमध्ये बदलणे आणि ब्रॉडगेज नेटवर्कला पूर्णपणे विद्युतीकरण करण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. रेल्वेचे विद्युतीकरण झाल्यास निश्चितच त्याचा पर्यावरणाला लाभ होईल आणि डिझेलवरील अवलंबित्वही कमी होईल. त्याबरोबरच रेल्वेची शक्ती आणि वेग दोन्हींतही वाढ होईल.
रेल्वे रुळांना फाटकरहित बनवण्याच्या दिशेनेही मोठे प्रयत्न सुरू आहेत.

देशभरात हजारो अंडर पास बनविण्यात आले आहेत आणि बनवले जात आहेत. प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन डब्यांची संख्या वाढवून ट्रेनची लांबी वाढविली जात आहे. त्या प्रमाणात प्लॅटफॉर्मची लांबीही वाढविली जात आहे. प्रवासी रेल्वेऐवजी अतिरिक्त हजारो कोटी रुपयांची कमाई असलेल्या मालगाड्यांसाठी समर्पित असणारा एक रेल्वे ट्रॅक बनविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. खरे तर भारतीय रेल्वेने काही कारणास्तव या विशेष ट्रॅकवर प्रवासी ट्रेन चालविण्याची परवानगी घेतली आहे. मात्र, मुख्यतः या ट्रॅकवर केवळ मालगाड्याच धावल्या पाहिजेत.

एकीकडे भारतीय रेल्वे आधुनिकीकरण, विकास आणि विस्तार होऊन वेगाने पुढे जात आहे, तर दुसरीकडे अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ट्रेन आणि प्रवाशांची सुरक्षा ही रेल्वे व्यवस्थापनाची सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या देशात वेगवेगळ्या मार्गांवर 'वंदे भारत ट्रेन' सुरू आहेत. प्रतितास 200 किलोमीटर वेगक्षमतेने धावणार्‍या या ट्रेनची कमाल वेगमर्यादा 130 कि.मी. प्रतितास इतकी निश्चित केली आहे. रेल्वेच्या योजनेनुसार अमृतमहोत्सवी वर्षादरम्यान शताब्दी ट्रेनपेक्षाही आधुनिक व वेगवान अशा एकूण 75 वंदे भारत ट्रेन पूर्ण देशभरात विविध मार्गांवर धावत आहेत; परंतु गेल्या काही दिवसांत केवळ एका सव्वा महिन्याच्या कालावधीत वंदे भारत ट्रेनचे चार अपघात झाले.

कुठे वंदे भारत ट्रेनने गायीला धडक दिली, तर कुठे म्हशींना टक्कर दिली. कुठे एखाद्या महिलेला धडक दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला, तर कुठे चाक जाम झाले. या अपघातांमुळे रेल्वे प्रवासाच्या सुरक्षेवर अगोदरच प्रश्नचिन्ह होते, ते आता वंदे भारत ट्रेनच्या रूपात पुन्हा समोर आले आहे. त्याचबरोबर वंदे भारत ट्रेनच्या तंत्रज्ञानातील त्रुटीही समोर आल्या आहेत. येथे हे लक्षात घ्यावे की, हे अपघात इतर ट्रेनमुळे नेहमीच घडत असतात. मात्र, वंदे भारतसारख्या व्हीआयपी आणि नव्या ट्रेनमुळे हे अपघात झाल्यामुळे हा विषय बातम्यांमध्ये चर्चेत आला आहे.

या अपघातांचे एकमात्र कारण म्हणजे देशभरातील रेल्वेमार्ग पूर्णपणे उघडे आहेत. हे रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करणे जनावरे आणि माणसांनाही सहज शक्य आहे. हे मार्ग ओलांडताना जनावरांबरोबरच माणसेही ट्रेनच्या अपघातात सापडतात. त्याचबरोबर उघडे रेल्वे रूळ विघ्नसंतोषी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून उखडले जातात. यामुळेही अनेकवेळा रेल्वेचे अपघात घडून येतात.

आता वंदे भारत ट्रेनच्या अपघातांनंतर रेल्वे विभागाचे डोळे उघडले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या धडकेत होणार्‍या अपघातांची संख्या कमी होण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. रेल्वे मंत्रालयाने एक विशेष प्रकारची बाऊंड्री वॉल म्हणजे सुरक्षा भिंतीच्या डिझाईनला मान्यता दिली आहे. नवी बाऊंड्री वॉल पुढील पाच ते सहा महिन्यांत काही विशेष रेल्वे मार्गांवर दुतर्फा उभारली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार किलोमीटर रेल्वे ट्रॅक्सवर दुतर्फा सुरक्षा भिंत उभी केली जाईल. ज्या रेल्वे मार्गांसाठी बाऊंड्री वॉल निश्चित केली आहे, त्यामध्ये उत्तर-मध्य रेल्वे आणि उत्तर रेल्वेचे झांसी झोन (वीरांगना लक्ष्मीबाई-ग्वालियर खंड), प्रयागराज झोन (पंडित दिनदयाळ उपाध्याय-प्रयागराज खंड), मुरादाबाद झोन (आलमनगर ते लखनौ) यांचा समावेश आहे. देशभरातील 68 हजार किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या जवळपास एक लाख वीस हजार किलोमीटर रेल्वे रूळाला सुरक्षा भिंत बांधणे हे अशक्य नाही.

आपल्याला चीन, अमेरिका आणि रशिया यांसारख्या देशांकडून हे शिकावे लागेल की, ट्रेन सुरक्षित कशी चालविली पाहिजे. आपल्या देशाप्रमाणेच या देशांतही जनावरे रेल्वे रुळांवरून भटकतात का? या देशांमध्येसुद्धा आपल्या देशाप्रमाणे लोक रेल्वे रूळावर शौच करण्यास जातात का? तसेच रेल्वे रूळ बेजबाबदारपणे ओलांडतात का? आपल्याकडे जसे रेल्वे रूळ उखडले जातात, तसे याही देशांमध्ये होते का? मृत जनावरे आणि कचरा रेल्वे रूळांवर फेकतात का? हे सर्व प्रश्न नागरिकांनी स्वतःला विचारायला हवेत.

– प्रसाद पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news