

सिमला; वृत्तसंस्था : हिमाचल प्रदेशला रेड अलर्टचा इशारा दिल्यानंतर उंच डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत आहे. यामुळे राज्यातील 350 हून अधिक रस्ते बंद झाले असून, 450 हून अधिक वीज ट्रान्स्फॉर्मर ठप्प झाले आहेत. अटल बोगद्यातून वाहनांची ये-जा बंद झाली आहे. सिमलासह मंडी, कुलू, लाहौल स्पीती, किन्नौर, कांगडा, आणि चंबा जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव होत आहे. सर्वाधिक हिमवर्षाव कुलू, चंबा आणि लाहौल स्पीती जिल्ह्यांत झाला आहे, त्यामुळे लाहौल स्पीती जिल्ह्यातील शाळा बंद राहणार आहेत. हिमाचल प्रदेशातील पर्वतराजीत मोठा हिमवर्षाव, तर राज्याच्या मैदानी भागात मुसळधार पाऊस झाला आहे. सिमला जिल्ह्यात बहुतांश भागात वादळामुळे जनजवीन विस्कळीत झाले आहे.
मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या हिमवर्षावामुळे अनेक ठिकाणी हिमखंड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटक आणि स्थानिक हिमखंडाच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाच्या इशार्यानंतर काही लोक उंच भागात जात आहेत.