

पिंपरी : कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेच्या क्रीडा विभागाने पदपथ, मोकळ्या जागा आणि उद्यान आदी ठिकाणी ओपन जीमचे साहित्य बसविले आहे. मात्र, त्यांचा दर्जा हलका असल्याने अनेक ठिकाणचे साहित्य काही महिन्यांतच तुटले आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते साहित्यतातडीने दुरूस्त करावे, अशी तक्रार जनसंवाद सभेत सोमवारी (दि.13) करण्यात आली.
सभेत एकूण 95 नागरिकांनी सहभाग घेऊन 125 पेक्षा अधिक तक्रारी मांडल्या. अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड काढावेत. ड्रेनेजलाइनची दुरुस्ती करावी. आवश्यक ठिकाणी नव्याने ड्रेनेज वाहिन्या टाकाव्यात. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी. अतिक्रमण हटवलेल्या जागेत पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घ्यावी. शहरात लावण्यात आलेले वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यावरील पथदिव्याचे जुने खांब योग्य ठिकाणी हलवावेत.
उच्च दाबाने सुरळीत पाणीपुरवठा करावा. स्थळदर्शक फलक बसवावेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात यावे. धूरफवारणी करावी. रस्त्यावरील अनधिकृत लावण्यात आलेल्या हातगाड्या हटवाव्यात. अनधिकृत नळजोडणी करणार्यांवर कारवाई करावी. स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या.
सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले सभेच्या अध्यक्षस्थानी अनुक्रमे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, सहायक आयुक्त प्रशांत जोशी, उपायुक्त अजय चारठाणकर, सहशहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले. या वेळी क्षेत्रीय अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते. मागील तक्रारींची सभेत आढावा घेण्यात आला.