

चेन्नई; वृत्तसंस्था : नवरी भारतात आणि नवरदेव अमेरिकेत, तरीही दोघांचे लग्न लागले. ऑनलाईन बार उडाला. ही कथा नाही, खरेच असे घडले आहे आणि तेही हायकोर्टाच्या परवानगीने! हे प्रकरण तामिळनाडूतील कन्याकुमारीचे आहे. निकाल आहे मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाचा…
व्हर्च्युअल लग्नाची संकल्पना कुणालाही आश्चर्यजनक वाटेल; पण भारतातील कायद्याची त्याला परवानगी आहे. पण फक्त 'स्पेशल मॅरेज अॅक्ट'अंतर्गत (विशेष विवाह कायदा) होणार्या विवाहांना.
राहुलशी ऑनलाईन लग्न लावण्यासाठी सुदर्शिनीने हायकोर्टाचे दार ठोठावले. न्यायमूर्ती स्वामिनाथन यांनी ऑनलाईन लग्नाला परवानगी दिली. विशेष विवाह कायद्याच्या कलम 12 चा आधार घेऊन व्हिडीओ कॉन्फरिन्संगच्या माध्यमातून लग्नाचा बार उडविला जाऊ शकतो, असे न्यायालयाने नमूद केले अन् लगोलग राहुल-सुदर्शिनीचे शुभमंगल झाले!
वासमी सुदर्शिनी हिचे भारतीय मूळ असलेल्या अमेरिकेतील राहुल मधूवर प्रेम जडले. लग्नासाठी राहुल भारतात आला. दोघांनी विशेष विवाह कायद्यांतर्गत मनावलकुरिची येथील उपनिबंधकांकडे संयुक्त अर्ज सादर केला. नोटीस प्रकाशित होताच राहुल याच्या पित्याने हरकत घेतली. तीस दिवसांची मुदत उलटल्यानंतर दुसर्या दिवशी राहुल-सुदर्शिनी हजर झाले. पण काही कारणांनी उपनिबंधक लग्न लावू शकले नाहीत. व्हिसाच्या अडचणींमुळे राहुलला लगेच अमेरिकेत परतावे लागले.