भगवान दत्तात्रेय : दिव्य ज्ञानावतार
अतिप्राचीन काळापासूनच या भारतभूमीत ज्ञानाला आणि ज्ञानदानाला सर्वोच्च महत्त्व देण्यात आलेले आहे. 'ज्ञानादेव तु कैवल्यम्' म्हणजे 'ज्ञानानेच मोक्ष मिळतो,' अशी मान्यता आहे. 'न हि ज्ञानेन सद़ृश्यं पवित्रमिह विद्यते' असे गीतेत म्हटले आहे. त्याचा अर्थ 'ज्ञानासारखी पवित्र करणारी वस्तू दुसरी नाही.' हे ज्ञान संपादन करण्यासाठी 'शाब्दे परे च निष्णात' अशा गुरूची आवश्यकता असते. मुंडक उपनिषदामध्ये म्हटले आहे की, 'तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम.' अशा 'श्रोत्रिय' व 'ब्रह्मनिष्ठ' गुरूकडे जाऊन ज्ञान संपादन करण्याची आपल्या देशात प्राचीन परंपरा आहे. भगवान दत्तात्रेयांकडे अशा आद्यगुरू रूपात पाहिले जात असते. या भगवदावताराचा उल्लेखच आपण 'श्री गुरुदेव दत्त,' असा नेहमी करीत असतो. प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत भगवान श्रीदत्तात्रेयांनी विविध शिष्यांना ज्ञानदान केल्याची वर्णने पाहायला मिळत असतात. अखंड ज्ञानदानाचे, अक्षुण्ण गुरुपरंपरेचे हे द्योतक आहे!
दत्तात्रेयांच्या शिष्यांमध्ये देवदेवतांपासून राजे, ऋषीमुनी, भिल्ल यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश होतो. कार्तिकेय, परशुराम यांच्यापासून सहस्रार्जुन, यदु, आयु, पृथु, प्रल्हाद यांच्यापर्यंत तसेच पिंगल नागमुनी, दलादन मुनी यांच्यापासून दूरश्रवा भिल्लापर्यंत अनेक जण श्रीदत्तगुरूंच्या शिष्यांमध्ये आहेत. अनेक संप्रदायांच्या आद्यपुरुषांना भगवान दत्तात्रेयांचा अनुग्रह लाभला असल्याची उदाहरणे आहेत. आखाडा परंपरा, आनंद संप्रदाय, वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय अशा अनेक संप्रदायांमध्ये श्रीदत्तगुरूंना अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे. भगवान दत्तात्रेयांचा उपदेश अनेक प्राचीन ग्रंथांमधूनही समजून घेता येतो. विशेषतः, त्रिपुरा रहस्य व अवधुत गीता यामधून त्यांच्या उपदेशांचा अभ्यास अनेक भाविक करीत असतात. भागवत पुराणातील 'यदु-अवधूत' संवादाचाही या हेतूने अभ्यास केला जात असतो.
वेदान्तामध्ये म्हणजेच उपनिषदांमध्ये एकमेवाद्वितीय परमचैतन्याचे 'ब्रह्म' या नावाने वर्णन आहे. मुंडक उपनिषदात म्हटले आहे की, 'ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति.' त्याचा अर्थ 'ज्याला ब्रह्मज्ञान होते तो ब्रह्मस्वरूपच होतो.' अशा आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच्या द़ृष्टीतून स्वतःविषयी आणि जगताविषयीचे जे भाव प्रकट केले जातात ते अष्टावक्र गीतेसारख्या ग्रंथातून दिसून येतात. 'अवधुत गीता'ही अशा मुक्त स्थितीचेच वर्णन करणारी आहे. अशा मुक्तात्म्यास सर्व काही ब्रह्मस्वरूपच दिसत असते. त्यामध्ये त्यांना किंचितही भेद दिसून येत नाही. नाम-रूप व कर्माचे वैविध्य असलेल्या या भौतिक जगताचा अध्यास त्यांच्या द़ृष्टीने दूर होऊन मूळ शाश्वत, अखंड, एकरस व आनंदसागर असे परमतत्त्वच त्यांना अनुभवण्यास येत असते. त्यामुळेच भगवान श्रीदत्तात्रेयांच्या रूपापासून ते कार्यापर्यंत सर्वत्र अभेदत्वच दिसून येते.
ब्रह्मा, विष्णू व शिव या रूपत्रयामध्ये भेद नसून, ते एकच आहेत, असा पहिलाच उपदेश श्रीदत्तात्रेयांचा अवतार देत असतो. भगवान दत्तात्रेयांनी ज्यांच्या पुत्ररूपात स्वतःचे दान करून 'दत्त' हे नामाभिधान स्वीकारले, त्या अत्री ऋषींना भारतीय संस्कृतीमध्ये मोठेच स्थान आहे. सप्तर्षींपैकी एक असलेल्या अत्री ऋषींच्या नावे ऋग्वेदात अनेक मंत्र आहेत. अशा मंत्रद्रष्ट्या ऋषीचे नावही 'अ-त्री' म्हणजेच 'तीन नसून एक' असेच सुचवणारे आहे. महर्षी कर्दम व देवहुती अशा तपःपुत दाम्पत्याच्या पोटी जन्मलेले दिव्य कन्यारत्न म्हणजे अनसुया. अनसुयेच्या नावातच 'असुयारहित' हा अर्थ आहे. ज्याची बुद्धी भेदरहित व असुयारहित होते त्यांनाच श्रीदत्तरूपाने परम ज्ञानलाभ होतो, असेच यामधून दिसून येते.
अनेक दत्तावतारी सत्पुरुषांनीही अभेदत्वाचा केवळ तात्त्विकद़ृष्ट्या उपदेश केला नसून, तो वास्तवातही साकारून दाखवलेला आढळतो. अशा सत्पुरुषांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, अक्कलकोट स्वामी, माणिकप्रभू, श्रीकृष्ण सरस्वती, गजानन महाराज, वासुदेवानंद सरस्वती, साईबाबा, गणेशपुरीचे भगवान नित्यानंद आदींचा समावेश होतो. कोणत्याही जाती, पंथ, संप्रदाय किंवा धर्माच्या लोकांमध्ये भेद न करता सर्वत्र केवळ एकच आत्मतत्त्व पाहण्याची द़ृष्टी श्रीदत्तगुरूंच्या उपदेशांमधून मिळत असते. त्यामुळे 'समन्वयाची देवता' या स्वरूपातही विविध धर्मांचे लोक भगवान श्रीदत्तात्रेयांकडे पाहत असतात. ज्याला खरे ज्ञान होते तो कधीही बाह्यरंगाला न भुलता अंतरंगातील शाश्वत, एकमेव तत्त्वच पाहतो, वेगवेगळ्या भेदांना झिडकारून ऐक्याचाच पुरस्कार करतो. श्रीदत्तगुरू रूपातील या ज्ञानावतारामधून सामाजिक ऐक्याचेही ज्ञान घेतले, तर व्यष्टी आणि समष्टीद़ृष्ट्या जीवनाचे सार्थक होऊ शकते. परंपरेने मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेयांची जयंती साजरी होते. त्यानिमित्त या आद्य गुरुरूपास शतशः वंदन!

