

पुणे / धायरी, पुढारी वृत्तसेवा: मुंबई बंगळुरु महामार्गावर तेल वाहतुक करणारा टँकर पलटी झाला. ही घटना आज सोमवारी सांयकाळी चार वाजेच्या सुमारास नर्हे येथील सेल्फी पॉईंट जवळ घडली. यावेळी महामार्ग व सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खोबरे तेलाचे पाठ वाहत होते. यावेळी 24 हजार लिटर तेलाचा टँकर तासाभरात रिकामा झाला.
या घटनेची माहिती समजताच सिंहगडरोड पोलिस ठाणे, सिंहगड वाहतुक शाखा कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहचले. दरम्यान मुंबई बाजुकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली. नवीन कात्रज बोगद्याच्या पाठीमागील वाहतुक जुन्या कात्रज बोगद्याच्या बाजूने सोडण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूवरून मुंबईला खोबरेल तेल घेऊन हा टँकर निघाला होता. नर्हे परिसरात येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर रस्त्यावरील दुभाजकावर चढला व पलटी झाला. या झालेल्या अपघातात टँकर चालक किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्ग व सेवा रस्ता एक किलोमीटर पर्यंत तेलकट झाला.
सुदैवाने या अपघातात कोणीही दगावले किंवा गंभीर जखमी झाले नाही. घटनेची माहिती समजताच, सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे निरीक्षक जयंत राजुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव,भारती विद्यापीड वाहतुक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे, सिंहगड वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, पोलिस नाईक अमर कोरडे अग्निशमन दलाचे जवान त्वरित घटनास्थळी पोहचले. सर्वांनी कर्मचार्यांसमवेत शेजारील मातीच्या ढिगार्यातील माती जेसीबीच्या साहाय्याने महामार्गावर व सेवा रस्त्यावर टाकली व वाहतुक सुरळीत केली. तरी पण अनेक दुचाकी व चारचाकी रस्त्यावरून जाताना घसरत होत्या.