

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सन 2022 मधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षणची सोडत गुरुवार (दि.28) सकाळी 11 वाजता श्रीमंत सरदार अजितसिंह दाभाडे व्यापारी संकुल बी विंगमध्ये होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली. सन 2022 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी या अगोदर प्रभाग रचना, मतदार यादी प्रसिद्ध करणे, अनुसूचित जाती जमाती व अनुसूचित जाती यांची आरक्षण सोडत, तसेच मतदान केंद्राची निश्चिती पूर्ण झाली असून 28 जुलै रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षणची सोडत होणार आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये एकूण 14 प्रभाग असून यामध्ये 28 नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे दोन व अनुसूचित जमाती एक महिला यांचे आरक्षण यापूर्वी पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 3, 4 व 10 यामध्ये मागासवर्ग प्रवर्गाची सोडत न काढता उर्वरित 11 प्रभागांसाठी ही सोडत काढली जाईल. यामध्ये एकूण 7 प्रभागांमध्ये ओबीसी आरक्षण होणार असून यामध्ये चार महिला व तीन पुरुष याचा समावेश असेल अशी माहिती उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिली.
सोडतीमध्ये होणारे ओबीसीचे आरक्षण कोणत्या प्रभागामध्ये येते. याकडे सर्व राजकीय क्षेत्रातील तसेच इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. तर भविष्यामध्ये नागरिकांमधून नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण कोणासाठी आहे. याकडे देखील राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.