समाजभान : ‘स्वप्नांचे ओएसिस’ असुरक्षित

समाजभान : ‘स्वप्नांचे ओएसिस’ असुरक्षित
Published on
Updated on

अमेरिकेतील क्लीव्हलँड विद्यापीठात आयटी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या हैदराबाद येथील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने अमेरिकेत शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वर्षात वेगवेगळ्या घटनांमध्ये11 भारतीय विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. आज भारताच्या गावखेड्यांपासून महानगरांपर्यंत शाळकरी, तरुण मुलांमध्ये शिक्षण घेऊन सातासमुद्रापार अमेरिकेला जाण्याची स्वप्ने पेरली जात आहेत; पण भारतीयांच्या संशयास्पद मृत्यूंचा चढता आलेख या स्वप्नांना कात्री लावणारा ठरू शकतो.

अमेरिकेतील क्लीव्हलँड विद्यापीठात आयटी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या हैदराबाद येथील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने अमेरिकेत शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा 25 वर्षांचा विद्यार्थी गेल्या महिन्यात त्याच्या विद्यापीठाच्या वसतिगृहातून बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मोबाईल 7 मार्चपासून बंद होता. अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे, 2024 या वर्षात गेल्या तीन महिन्यांत अमेरिकेमध्ये 11 भारतीय विद्यार्थ्यांची हत्या किंवा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. हैदराबादच्या अब्दुल अरफाथच्या कुटुंबीयांनी सांगितले की, एका व्यक्तीने त्यांच्याकडे अज्ञात कॉलद्वारे खंडणीची मागणी केली होती.

कोणत्या तरी गुन्हेगारी टोळक्याने त्याचे अपहरण केल्याचे बोलले जात होते. पालकांनीही परराष्ट्र मंत्रालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. गेल्या महिन्यात 21 मार्च रोजी न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकार्‍यांनी सांगितले होते की, ते स्थानिक अधिकार्‍यांशी समन्वय साधत आहेत. गेल्या आठवड्यात क्लीव्हलँडमध्ये उमा सत्य साई या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची चौकशी सुरू असून, कारण अद्याप समजू शकलेले नाही. गेल्याच महिन्यात भारतातील प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना अमरनाथ घोष यांची मिसुरी येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मार्च महिन्यातच भारतीय वाणिज्य दूतावासाने वीस वर्षीय भारतीय विद्यार्थी अभिजितच्या मृत्यूची माहिती दिली होती. त्याचप्रमाणे फेब्रुवारीमध्ये समीर कामथ हा 23 वर्षीय अमेरिकन-भारतीय विद्यार्थी इंडियाना येथील निसर्ग संवर्धन क्षेत्रात मृतावस्थेत आढळला होता.

2 फेब्रुवारीला वॉशिंग्टनमधील एका रेस्टॉरंटबाहेर आयटी अभियंता 25 वर्षीय विवेक सैनीची एका बेघर व्यक्तीने हातोडीने घाव घालून हत्या केली होती. सैनीने नुकतेच एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. जुलियन फॉकनर नावाच्या बेघर आणि नशेखोर व्यक्तीने सैनीची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, सैनीने या बेघर व्यक्तीला आश्रय देऊन, खाऊ-पिऊ घातले होते. जानेवारीत इलिनॉयमध्ये अकुल धवन या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. नील आचार्य नावाचा आणखी एक भारतीय विद्यार्थी जानेवारी महिन्यात मृत्युमुखी पडला. इंडियाना राज्यातील पर्ड्यू विद्यापीठात नील शिक्षण घेत होता. पर्ड्यू विद्यापीठातील जॉन मार्टिसन होनर्स महाविद्यालयातून त्याने कॉम्प्युटर आणि डेटा सायन्समध्ये पदवी घेतली होती. तो बेपत्ता झाल्याचे समोर आले आणि दुसर्‍याच दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात 26 वर्षीय आदित्य अदलखाचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. भारतात वैद्यकीय शिक्षण घेऊन अमेरिकेच्या सिनसिनाटी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या आदित्यचा ओहियो राज्यात खून झाला होता. गाडीत बसलेला असताना त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. आण्विक आणि विकासात्मक जीवशास्त्र विषयात पीएच.डी. करण्यासाठी आदित्य अमेरिकेत गेला होता.

या सर्व घटना अत्यंत चिंताजनक असून, मन विषण्ण करणार्‍या आहेत. भारतीय विद्यार्थ्यांच्या मनात 'स्वप्नांचे ओएसिस' अशी अमेरिकेविषयीची धारणा आता असुरक्षित बनली आहे, हे या घटनांमधून दिसून येते. मागील काळात अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांनी 'भारतीय तरुण तुमच्या नोकर्‍या खाऊन टाकतील,' असे विधान केले होते. वर्णद्वेषी वृत्ती असो, गुन्ह्यांचे जग असो, अमली पदार्थांच्या तस्करांचे जाळे असो किंवा मत्सराची प्रतिक्रिया असो, त्याचा त्रास निरपराध स्थलांतरितांना भोगावा लागतो.

कारणे काहीही असोत; पण आज भारतातील, महाराष्ट्रातील पालक अमेरिकेमध्ये शिक्षण-नोकरीसाठी गेलेल्या मुलांच्या काळजीने चिंताग्रस्त होत आहेत. आज भारताच्या गावाखेड्यांपासून महानगरांपर्यंत शाळकरी, तरुण मुलांमध्ये शिक्षण घेऊन सातासमुद्रापार अमेरिकेला जाण्याची स्वप्ने पेरली जात आहेत; पण भारतीयांच्या संशयास्पद मृत्यूंचा चढता आलेख या स्वप्नांना कात्री लावणारा ठरू शकतो. भारतीय पालक अक्षरशः सर्वस्व पणाला लावून आपल्या मुलांना शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवतात. यासाठी बँकांकडून कर्जे घेतात. मुलगा तिथे शिक्षण घेत असताना पालक पोटाला चिमटा देऊन, काटकसर करून या कर्जाचे हप्ते फेडत असतात. अशा स्थितीत विद्यार्थ्याच्या हत्येने संपूर्ण कुटुंबच दु:खात आणि नैराश्यात बुडून जाते. विद्यार्थ्याचा मृत्यू म्हणजे प्रतिभेच्या सर्व शक्यतांचा शेवट होय.

एकीकडे उच्चशिक्षण आणि रोजगारासाठी मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थ्यांचे सतत होणारे स्थलांतर हा आपल्या धोरणकर्त्यांसाठी आत्मपरीक्षणाचा विषय आहे. आपण भारतात आपल्या मातीतल्या, आपल्या तरुणांच्या कलागुणांना अनुकूल शैक्षणिक आणि रोजगाराचे वातावरण का देऊ शकत नाही, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तोवर दुसरीकडे, सातासमुद्रापार गेलेल्या या मुलांच्या सुरक्षिततेविषयीचीही हमी राहिलेली नाहीये. पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नूयी यांनी भारतीय विद्यार्थ्यांसोबत घडणार्‍या घटनांवर केलेली टिपणीही विचारात घेण्यासारखी आहे. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सावध राहा, सुरक्षिततेसाठी स्थानिक कायद्यांचा आदर करा आणि अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. या टिपणीतील मर्म जरी योग्य असले, तरी त्यातून भारतीय विद्यार्थी कायदेभंग करत आहेत किंवा अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत, असा नकारात्मक संदेशही जाण्याचा धोका आहे.

अमेरिकेमध्ये आजघडीला भारतीय वंशाचे सुमारे 2,75,000 विद्यार्थी आहेत. अमेरिकेतील एकूण परदेशी विद्यार्थ्यांचा विचार करता, भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण 25 टक्के आहे. येणार्‍या काळात विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूचे सत्र असेच सुरू राहिले किंवा वाढत गेले, तर पालकांच्या मनात भीती निर्माण होईल. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत नुकतीच टिपणी करताना, सरकारसाठी ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी धोकादायक ठिकाणे टाळण्याचे आणि दूतावासाने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांचा एकमेकांशी संबंध नाही, असेही ते म्हणाले आहेत. तथापि, तरनजितसिंग संधू यांच्या निवृत्तीला तीन महिने उलटले, तरी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासात पूर्णवेळ राजदूत नेमण्यात आलेला नाहीये. घडलेल्या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने त्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे, एवढीच यानिमित्ताने अपेक्षा बाळगू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news