

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई महामार्गावर आता ऑक्टोबर महिन्यापासून आयटीएमएस (इंटेलिजन्स ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम) यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावर सातत्याने होणारी कोंडी सोडविण्यास आणि अपघात टाळण्यासाठी मोठी मदत होणार आहे. याचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती (पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे) महामार्गावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी आणि कोंडी सोडविण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून हाती घेण्यात आला आहे. सुमारे 60 कोटी रुपये खर्च करून पीपीपी तत्त्वावर आयटीएमएस उभारण्यात येत आहे. अपघातग्रस्तांना या यंत्रणेद्वारे त्वरित मदत पोहचविता येणार आहे.
कंट्रोल रूमद्वारे 24 तास निरीक्षण
या यंत्रणेचे व्यवस्थापन करण्यासाठी कुसगाव येथे कमांड अँड कंट्रोल सेंटर म्हणजेच कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. तेथे बसून महामार्ग पोलिस आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) मार्गावर 24 तास लक्ष ठेवून नियमभंग करणार्या वाहनांवर कारवाई करतील.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅमेरे
द्रुतगती मार्गावर 106 ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान असलेले 430 हाय क्वालिटी सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक वाहनांवर लक्ष ठेवणार आहे. तसेच या यंत्रणेद्वारे 17 प्रकारच्या नियमभंगांवर कारवाई होणार आहे.
महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळून वाहनचालकांकडून नियमांचे पालन व्हावे आणि त्यांना वाहतूक शिस्त लागावी, याकरिता ही यंत्रणा बसवण्यात येत आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या यंत्रणेद्वारे कारवाई होणार असून, वाहतूक कोंडीदेखील सोडविण्यात येईल. येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होईल. एमएसआरडीएकडून याचे नियोजन करण्यात येत आहे.
-लता फड, पोलिस अधीक्षक, महामार्ग
हेही वाचा :