

सातारा; पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या इटीआयएम मशिनमध्ये वारंवार होणारे बिघाड, सुटया पैशावरून प्रवाशी व वाहकांमध्ये होणारे वाद याला आळा घालण्यासाठी लालपरीमध्ये महामंडळामार्फत आता अँड्राईड तिकीट मशिन देण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहक आता स्मार्ट होणार असून खिशात रोख पैसै नसतानाही एसटीतील प्रवाशांना आता आपल्या मोबाईलवरील गुगल -पे, फोन पे, कार्ड पेमेंटच्या माध्यमातून डिजिटल तिकीट काढता येणार आहे.
सदोष मशिनमुळे अनेकदा एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी असताना कोर्या कागदावर तिकीट लिहून देण्याची वेळ वाहकांवर येते. त्यामुळे महामंडळानेही वाहकांच्या डोक्याला तापदायक ठरलेल्या जुन्या तिकीट इश्यू मशीन हद्दपार करून त्या जागी आता नवीन इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे.
आधुनिक अँड्राईड ई- तिकीट मशिनमुळे लालपरीचे वाहक आता हायटेक झाले आहेत. एसटीमधील गर्दी लक्षात घेता प्रवाशांना तात्काळ तिकीट मिळणार आहेत. सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव खंडाळा, फलटण, कोरेगाव, दहिवडी, वडूज, मेढा या 11 आगारातील वाहकांना याबाबत संबंधित कंपनी व एसटी प्रशासनामार्फत लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याबाबतचे नियोजन आगार स्तरावर सुरू आहे.
जिल्ह्याला 1 हजार 702 आधुनिक अँड्राईड ई- तिकीट मशिन मिळाल्या आहेत. याबाबत आगार स्तरावर संबंधित कंपनी व प्रशासनामार्फत सर्वच वाहकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवीन अँड्राईड ई -तिकीट मशिन, चार्जर व मशीन कव्हर संहित वाहक व चालक तथा वाहकांच्या नावावर नोंद होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र रजिस्टर तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहकाला काळजीपूर्वक मशिन हाताळावे लागणार आहे. अँड्राईड ई तिकीट मशिन व चॉर्जर डॅमेज, गहाळ किंवा चोरी झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी वाहकांची राहणार आहे.
आधुनिक अँड्राईड ई तिकीट मशिनमुळे व्यवहार सुटसुटीत होणार आहेत. प्रवाशांचे वाहकांशी सुटटया पैशावरून नेहमी होणारे वादविवाद मिटणार आहेत. सर्वच आगारातील वाहकांना या मशिन देण्यात येणार आहेत.
रोहन पलंगे
विभाग नियंत्रक, सातारा