

वॉशिंग्टन : भारताच्या 'चांद्रयान-3' चे विक्रम लँडर तसेच जपानचे 'स्लिम' यानाचे लँडर अलिकडच्या काळात चांद्रभूमीवर यशस्वीरित्या लँड झाले. आता खासगी क्षेत्रातही असे मून लँडर बनवली जात आहेत. एलन मस्क यांच्या 'स्पेस एक्स' कंपनीकडूनही काही आठवड्यांमध्ये असे एक खासगी मून लँडर लाँच केले जाणार असून, त्याचे नाव 'नोव्हा-सी लँडर' असे आहे. हे लँडर अमेरिकेतील 'इंट्यूटिव मशिन्स' या खासगी कंपनीने बनवले आहे. फेब्रुवारीच्या मध्यास हे लँडर 'स्पेस एक्स'च्या सहाय्याने चंद्रावर पाठवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच्या लाँचिंग तारखेची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
'स्पेस एक्स'च्या 'फाल्कन 9' या रॉकेटच्या सहाय्याने काही आठवड्यांमध्ये हे लँडर चंद्रावर पाठवले जाईल. अमेरिकेतील हौस्टनमधील 'इंट्यूटिव मशिन्स' या कंपनीच्या 'स्पेस सिस्टीम्स'चे उपाध्यक्ष ट्रेंट मार्टिन यांनी सांगितले की, या लँडरचे काम आता पूर्ण झालेले असून ते चंद्रावर जाण्यासाठी सज्ज आहे. फ्लोरिडाच्या केप कॅनाव्हरल स्पेस स्टेशनवरून काही दिवसांनी हे लँडर चंद्राकडे पाठवले जाईल. मात्र, स्पेस एक्स किंवा इंट्यूटिव मशिन्सकडून याबाबतची तारीख घोषित केलेली नाही.
22 फेब्रुवारीला हे लँडर चंद्रावर लँड केले जाण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वीच त्याचे पृथ्वीवरून लाँचिंग केले जाईल. जर त्यावेळी हे लाँचिंग होऊ शकले नाही तर मार्चमध्ये त्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या मोहिमेला 'आयएम-1' असे नाव देण्यात आले आहे. त्यामध्ये 'नोव्हा-सी' लँडरला 'मॅलापर्ट ए' असे नाव दिलेल्या चंद्रावरील विवराजवळ लँड केले जाईल. हे ठिकाण चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच आहे. हेच ठिकाण जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांच्या कुतुहलाचे बनलेले आहे. याचे कारण म्हणजे तिथे पाण्याच्या बर्फाचा साठा असल्याचे मानले जाते.