पिंपरी: नागरिकांसाठी असलेले संपर्क क्रमांक शोेभेचे!

पिंपरी: नागरिकांसाठी असलेले संपर्क क्रमांक शोेभेचे!
Published on
Updated on

मिलिंद शुक्ल

पिंपरी: दैनंदिन जीवनात नागरिक विविध सार्वजनिक सेवांचा लाभ घेत असतात; मात्र या सेवांमध्ये काही त्रुटी आढळल्यास अथवा त्या सेवा विस्कळीत झाल्यास संबंधित सेवा पुरवठादारांकडून त्याच्या निराकरणासाठी संपर्क क्रमांक दिलेले असतात. जेणेकरून नागरिकांच्या समस्यांचे वेळेत निराकरण व्हावे; मात्र हे संपर्क क्रमांकच सध्या शोभेचे किंवा कुचकामी ठरत आहेत. यासंदर्भात रेल्वे, एस.टी., मेट्रो आणि पीएमपीएमएल या प्रवासी सेवा तसेच पाणी, वीज, आरोग्य आणि ड्रेनेज या काही प्रमुख सेवांच्या हेल्पलाईन संदर्भात नागरिकांचे अनुभव तपासले असता संबंधितांच्या समस्यांचे निराकरण न झाल्याचे निष्पन्न
झाले आहे.

पाणी आणि ड्रेनेज:

एका उपनगरातील काही नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयाकडे ड्रेनेज नेहमी तुंबतेय म्हणून तक्रार करण्यासाठी फोन केला; मात्र पलीकडून फोल उचलण्यात आला नाही. तसाच अनुभव पाण्याबाबतच्या प्रश्नावरही आला. पालिकेच्या विभाग प्रमुखांकडे दूरध्वनी केल्यावर त्यांच्याकडून क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार करा, असे सांगितले. क्षेत्रीय कार्यालयात तक्रार करण्यास गेल्यावर तेथे कोणी उपस्थित नव्हते. दुसर्‍या दिवशी गेल्यावर तक्रार ऐकून घेतली. पण निराकरण चार दिवसांनी झाले.

महापालिका दवाखाने: पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या हेल्पलाईनबद्दल संमिश्र अनुभव आहे. एका रुग्णाच्या नातेवाइकाने अचानक त्रास झाल्यावर रुग्णालयाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क केल्यावर त्यांना योग्य माहिती मिळून रुग्णालयात दाखल करण्यास मदत झाली. तर ते दुसर्‍या एका रुग्णाला मात्र या क्रमांकावरून व्यवस्थित माहिती न मिळाल्याने उपचार मिळण्यास उशीर झाला. शिवाय मनस्ताप सहन करावा लागला.

अग्निशामक दल, पोलिस, महावितरण :

अग्निशामक दल 101, पोलिस 100 आणि महावितरण 18002123435 या तीन विभागाच्या संपर्क क्रमांकावर त्वरित संपर्क साधला जातो. नागरिकांच्या याबाबतच्या चांगल्या प्रतिक्रिया होत्या. मात्र, अतिमहत्त्वाच्या कारणासाठी चांगली उत्तरे मिळतात. त्यातील महावितरणच्या हेल्पलाईनचा अनुभव नागरिकांना वाईट आहे. एका नागरिकाने पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो की पूर्ववत होईल, याबाबत विचारणा केली होती. त्याबाबत तेथील कर्मचार्‍याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे उत्तर दिले. मात्र, तरीही दुसर्‍या दिवसापर्यंत वीजपुरवठा खंडितच होता. येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

एसटी:

एसटी प्रवाशांचा अनुभव तर खूपच वाईट म्हणावा लागेल. या प्रवाशांनी 1800221250 या नंबरवर कॉल केल्यावर लागला, मात्र फोन कोणीही उचलला नाही. शेवटी या प्रवाशांना स्टँडवर जावून चौकशी करावी लागली. यात त्यांचा बराच
वेळ वाया गेला.

पीएमपीएमएल:

एक वृद्ध प्रवाशाने पीएमपीएमएलच्या क्रमांकावर आळंदी आणि देहूसाठी गाडी किती वाजता आहे, अशी चौकशी केली. पीएमपीएमएलच्या कर्मचार्‍याने त्यांना तिकडे जाणार्‍या गाड्यांच्या वेळा व मार्ग सांगितले. याच प्रमाणे इतर दोन ते तीन जणांनी चांगला अनुभव आल्याचे सांगितले.

टेलिफोन:

हॅलो टेलिफोन कस्टमर केअर का? हो.. माझा लँडलाईन नंबर तीन दिवसांपासून बंद आहे. तक्रार पण केली आहे. या ग्राहकाच्या प्रश्नावर कर्मचार्‍याने बर पाहतो, असे उत्तर दिले. दोन दिवसांनंतर पुन्हा तक्रार केल्यानंतर ठीक आहे, दुरुस्तीसाठी माणूस येईल, असे कर्मचार्‍याने सांगितले. दोन दिवसांनंतर माणूस आला, दुरुस्त करून गेला. दहा, पंधरा दिवस टेलिफोन चालला. पुन्हा तीच परिस्थिती. शेवटी कंटाळून लँडलाईन टेलिफोन बंद केल्याचे संबंधित नागरिकाने सांगितले. (टेलिफोन: 198/1500 टेलिफोनवरून तक्रार करायची असल्यास किंवा दुसर्‍या कोणत्याही फोनवरून 1800-345-1500 या नंबरवर संपर्क साधून तक्रार करता येते.)

आरटीओ:

अनेक वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या फोन क्रमांकाची माहिती मिळण्यासाठी योग्य उपयोग होत आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यावर येथील कर्मचार्‍याकडून आवश्यक कागदपत्रे व त्याबाबतची माहिती मिळते. पण त्यासाठी किती वेळ लागणार त्याची प्रक्रिया काय, याबाबत माहिती मिळत नसल्याची तक्रार वाहचालकांनी केली आहे.

पुणे मेट्रो:

सध्या प्रवास करत असलेल्या प्रवाशांचे अनुभव संमिश्र आहेत. एका प्रवाशाने संपर्क क्रमांकावर कॉल केल्यावर त्याला तेथील कर्मचार्‍याने मेट्रोच्या फेर्‍यांबद्दल माहिती दिली. तर दुसर्‍या दोन प्रवाशांना त्याच नंबरवर अपेक्षित उत्तर मिळाले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news