

बिजिंग; पुढारी ऑनलाईन : चायना इस्टर्न एअरलाईन्सचे विमान कोसळून कोणीही वाचले नसल्याची अधिकृतपणे चिनी अधिकाऱ्यांनी शनिवारी पुष्टी केली. सर्व 132 प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. चीनच्या नागरी हवाई वाहतूक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने रात्री उशिरा पत्रकार परिषदेत केलेल्या या घोषणेनंतर काही काळ मौन पाळण्यात आले. डीएनए विश्लेषणाद्वारे तपासकर्त्यांनी 120 मृतांची ओळख पटवली आहे.
हे विमान सोमवारी नैऋत्य चीनमधील कुनमिंग शहरातून 29,000 फूट (8,800 मीटर) उंचीवर उड्डाण करत होते. ग्वांगझूमध्ये उतरण्याच्या काही वेळापूर्वी ते अचानक डोंगराळ भागात कोसळले. शनिवारी अपघातस्थळी विमानाचे अवशेष, मानवी अवशेष आणि ब्लॅक बॉक्स शोधण्यात आला. जिथे तपासकर्त्यांना कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सापडला आहे, परंतु फ्लाइट डेटा रेकॉर्डर अद्याप सापडलेला नाही.
या संपूर्ण अपघाताचे कारण सध्या तरी गूढच राहिले आहे. अधिका-यांनी सांगितले की, एका हवाई वाहतूक नियंत्रकाने उंचीमध्ये तीव्र घसरण पाहून वैमानिकांशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
फॉरेन्सिक आणि गुन्हेगारी तपास तज्ञांनी 114 प्रवासी आणि सहा क्रू सदस्यांच्या ओळखीची पुष्टी केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर, चीनच्या चार प्रमुख एअरलाइन्सपैकी एक असलेल्या चायना इस्टर्नने आणि त्यांच्या सहाय्यक कंपन्यांनी त्यांची सर्व विमाने थांबवली आहेत.