

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणार्या कामगारांना राज्य कामगार विमा योजनचे ई-पेहचान पत्र दिल्याशिवाय ठेकेदाराला बिल देऊ नये, असे आदेश मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांनी सर्व खात्यांना दिले आहेत.
महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयामधील झाडण कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, साफसफाई कर्मचारी, आस्थापनेवरील कर्मचारी सुरक्षा विभागातील कर्मचारी, मोटार वाहन विभाग, माहिती तंत्रज्ञान विभागाकडील कर्मचारी, पथ विभाग अशा विभागांतील कर्मचारी हे कंत्राटी आहेत.
राज्य कामगार विमा अधिनियम 1948 मधील तरतुदीनुसार कंत्राटी कामगारांना त्यांचा विमा क्रमांक अवगत होणे, आधारकार्ड लिंक करणे, वैद्यकीय सुविधा मिळणेसाठी ई-पेहचान पत्र कंत्राटी कामगारांकडे असणे आवश्यक आहे. याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी कंत्राटी कामगारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालिकेतील ठेकेदार ई-पेहचान पत्र देत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार संबंधित विभागांनी त्यांचेकडील सर्व कंत्राटी कामगारांना ई-पेहचान पत्र वितरीत केल्याची खात्री केल्याशिवाय संबंधित ठेकेदारांची देयके अदा करण्यात येऊ नयेत, असे आदेश काढण्यात आल्याचे दौंडकर यांनी सांगितले.