लढवय्या मित्र हरपला

लढवय्या मित्र हरपला
Published on
Updated on

[toggle title=" सुबोध भावे, सुप्रसिद्ध अभिनेते" state="open"][/toggle]

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणार्‍या नितीन देसाई याचे निधन वेदनादायी आहे. नितीन हा प्रभातच्या काळानंतर स्वतःचा स्टुडिओ असणारा मराठीतील एकमेव निर्माता होता. 'बालगंधर्व' हा चित्रपट नितीन देसाई नसता, तर होऊच शकला नसता. प्रेक्षकांसाठी काहीतरी करून दाखवण्याबाबतचा जो टोकाचा वेडेपणा बालगंधर्व यांच्यात होता तोच नितीनमध्ये होता.

ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई याच्या निधनाची वार्ता धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी ठरली. एखाद्या सकाळी उठल्यानंतर नितीनविषयी असे काही तरी कानी येईल, असे कधीच वाटले नाही. कारण, तो लढवय्या होता. आजवर आलेल्या अनेक संकटांचा धैर्याने सामना करत त्यावर मात करत तो त्यातून बाहेर पडला होता. त्यामुळे इतके टोकाचे पाऊल तो कधी उचलेल असे वाटण्याची शक्यताच नव्हती. गेल्या वर्षी त्याच्या स्टुडिओला आग लागली. या आगीत 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जोधा अकबर' या चित्रपटाचा सेट खाक झाला होता. नितीनसाठी ही घटना फार गंभीर होती; पण त्यावेळीही तो डगमगला नाही. त्याने पुन्हा स्टुडिओ उभा केला. त्यामुळे छोट्या-मोठ्या संकटांनी डगमगणारा नितीन कधीच नव्हता. उलट काम कसे करायचे, मोठी स्वप्ने पाहून त्यांच्या मागे लागून ती पूर्णत्वाला कशी न्यायची, हे आम्ही नितीनकडे पाहून शिकलो. साहजिकच अशा व्यक्तीने अनैसर्गिक पद्धतीने मरण पत्करावे, ही बाब मनाला चटका लावून गेली.

नितीन हा प्रभातच्या काळानंतर स्वतःचा स्टुडिओ असणारा मराठीतील एकमेव निर्माता होता. कितीतरी उत्तमोत्तम कलाकृती त्याच्यामुळे पडद्यावर सुंदर दिसल्या. इतके सुंदर चित्र घडवणारा आमचा मित्र स्वतःच्या आयुष्याचे चित्र असे बेरंग का करून गेला, हा प्रश्न मनाला सतावणार आहे.

मुळात नितीनचा स्वभाव हा स्वतःच्या अडीअडचणींविषयी बोलणारा नव्हता. तो नेहमी कलेच्या गोष्टी बोलायचा, नवीन स्वप्ने दाखवायचा. स्वतःच्या आयुष्यातील समस्या त्याने कधी कुणाला सांगितल्या असतील, असे मला वाटत नाही. आमचे नियमित बोलणे व्हायचे. गेल्या महिन्यामध्ये मी त्याच्या एनडी स्टुडिओमध्ये गेलो होतो तेव्हा त्याने मला आणि आमच्या टीमला स्वतः सोबत फिरून सगळा स्टुडिओ दाखवला होता. त्यानंतर मी माझ्या कुटुंबीयांसोबत कर्जतला गेलो होतो तेव्हाही त्यानं आम्हाला अगदी आस्थेने सर्व स्टुडिओ फिरून दाखवला. अगदी काही दिवसांपूर्वी 'बालगंधर्व'च्या पॉडकास्टच्या निमित्ताने आम्ही एकत्र भेटणार होतो; पण बाकीची मंडळी नसल्यामुळे ती भेट रद्द झाली. नितीनच्या महाराणा प्रताप यांच्यावरील वेबसीरिजमध्येही मी काम करणार होतो. त्यामुळे नितीन हा सदोदित कामात मग्न असणारा होता. अलीकडील काळातील भेटीत त्याच्या चेहर्‍यावर थकवा, तणाव दिसून यायचा; पण वयोमानानुसार किंवा खूप काम केल्यामुळे किंवा पुरेशी झोप न घेतल्यामुळे तो असावा असे वाटायचे. त्यामागे इतके काही तरी घडत असेल आणि त्यामुळे त्याला इतके टोकाचे पाऊल उचलावे लागेल, असे कधीच वाटले नाही. आर्थिक समस्या असल्या, तरी त्याच्या कार्यक्षमतेवर, जिद्दीवर, धडाडीवर आमचा विश्वास होता. हा माणूस कसल्याही संकटावर मात करून बाहेर पडेल याची खात्री वाटायची. त्यामुळेच त्याच्या निधनाच्या बातमीने मी निःशब्द झालो.

'बालगंधर्व' हा चित्रपट नितीन नसता तर होऊच शकला नसता. प्रेक्षकांसाठी काहीतरी करून दाखवण्याबाबतचा जो टोकाचा वेडेपणा बालगंधर्वांमध्ये होता तोच नितीनमध्ये होता. त्यामुळे 'बालगंधर्व' करण्याचे ठरल्यानंतर अवघ्या चार महिन्यांमध्ये त्याने सेट उभा केला. इतक्या वेगाने आणि मेहनतीने त्याने काम केले. बालगंधर्वांनी जे भव्यदिव्य नाटक करण्याचे स्वप्न पाहिले, तशाच प्रकारे 'बालगंधर्व' चित्रपट करण्याचे स्वप्न नितीनने पाहिले. नितीनशिवाय हा चित्रपट दुसरे कुणीही करू शकले नसते. सकाळी 6 वाजता ऑफिसमध्ये येऊन तो काम सुरू करायचा आणि रात्री उशिरा त्याचे काम सुरू असायचे. मेहनतीच्या बाबतीत तो आमच्यापेक्षा नेहमीच पुढे असायचा. एका छोट्याशा घरातील मुलाने स्वतःच्या कर्तृत्वावर घेतलेली इतकी मोठी झेप पाहून अभिमान वाटायचा. कलाक्षेत्रातील त्याची जागा कुणीही भरून काढू शकणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news