चंद्रपूर : हजारों नागरिकांच्या उपस्थितीने गाजली “निर्भय बनो” सभा

चंद्रपूर : हजारों नागरिकांच्या उपस्थितीने गाजली “निर्भय बनो” सभा
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूरातील विविध विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन गुरुवारी (दि. १४ मार्च) रोजी महाराष्ट्रात सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या 'निर्भय बनो' या अभियांनांतर्गत सभेचे आयोजन "आम्ही निर्भय चंद्रपूरकर" या बॅनर खाली केले गेले. या अभियानात डॉ. विश्वंभर चौधरी व ॲड. असीम सरोदे यांनी सभेला संबोधित केल्याने सभा चांगलीच गाजली.

देशात सुरू असलेल्या लोकशाही विरोधी हालचालींना आटोक्यात आणायचे असेल तर लोकशाहीत सार्वभौम असलेल्या जनतेलाच साद घातली पाहिजे. म्हणून या सर्व विविध राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सजग नागरिकांनी एकत्र येऊन 'आम्ही निर्भय चंद्रपूरकर' या नावाने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने या सभेचे आयोजन केले.

चंद्रपूर शहरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास झालेली हजारोची गर्दी चर्चेचा विषय ठरली होती. समाज माध्यमांचा वापर न करता, प्रत्यक्ष संपर्कातून सभेचा प्रचार करण्यात आला होता. सभेकारिता येणाऱ्या खर्चाची तरतूदही निधी संकलन न करता दात्यांनी प्रत्यक्ष वस्तू वा सेवांचे पैसे देऊन संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला.

या सभेस संबोधित करताना ऍड. असीम सरोदे यांनी सध्या हुकूमशाहीकडे होत असलेल्या वाटचाली संदर्भात संविधानाच्या उल्लंघनाच्या नेमक्या घटनांवर बोट ठेऊन त्याच्या दीर्घकालीन दुष्परिणामांविषयी श्रोत्यांना अवगत केले. ते म्हणाले, सध्या देशात जी राजकीय परिस्थिती आहे, ती अघोषित आणीबाणी आहे. राजकीय विरोधकांवर तसेच विरोधात बोलणाऱ्या पत्रकार, बुद्धिजीविंवर जी दडपणं आणली जात आहेत, त्याची कुठलीही तरतूद आपल्या संविधानात नाही.

डॉ. विश्वभर चौधरी यांनी पर्यावरण ऱ्हासाचा मुद्दा मांडतांना सांगितले की, गेल्या दहा वर्षात देशातील धनाढ्य लोकांना फायदा करून देण्यासाठी सात लक्ष एकर जंगल कापलं गेलं. ते म्हणाले सध्या जो बेगडी धर्मवाद आणि भंपक राष्ट्रवाद माजवला जातो आहे, त्याचं खरं कारण सरकारच्या आर्थिक आघाडीवरील अपयशात दडलं आहे. न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानात झालेल्या या सभेस चंद्रपूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सभेचे संचालन डॉ. योगेश दुधपचारे यांनी तर प्रास्ताविक बंडू धोतरे आणि आभार उमाकांत धांडे यांनी मानले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news