बारामती: पोलिस, वकीलांच्या नावाने उकळली साडेनऊ लाखाची खंडणी

file photo
file photo
Published on
Updated on

बारामती, पुढारी वृत्तसेवा: महाविद्यालयीन युवकाविरोधात पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्काची कारवाई होणार असल्याची भिती त्याच्या कुटुंबियांना दाखवत पोलिस अधिकाऱ्यांना, वकीलांना, न्यायालयाला पैसे द्यावे लागतील, असे सांगत वेळोवेळी साडे नऊ लाखांची खंडणी वसूल करणाऱ्या महाठगाला पोलिसांनी पैसे घेताना रंगेहाथ पकडले. जिल्हा व सत्र न्यायालयाजवळ गुरुवार ६ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. प्रशांत शिवाजी थोरात (रा. सूर्यनगरी, बारामती) असे पोलिसांनी पकडलेल्याचे नाव आहे.

याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अक्षय अशोक रणसिंग (रा. विठ्ठलनगर हौसिंग सोसायटी, मार्केट यार्डजवळ, बारामती) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीच्या चुलत भावाला पोलिसांनी लुटमार प्रकरणात डिसेंबरमध्ये अटक केली होती. त्यानंतर थोरात याने जानेवारीत या संबंधी रणसिंग कुटुंबाला संपर्क करत मुलाचा जामीन करायचा आहे का ? अशी विचारणा केली. त्यावर या कुटुंबाने सत्र न्यायालयाने जामीन नामंजूर केल्याचे सांगितले. थोरात याने त्यानंतर सातत्याने या कुटुंबाशी संपर्क वाढवला. लुटमार प्रकरणात आरोपी असलेल्या युवकाच्या वडीलांना गाठले. तुमच्या मुलाविरोधात पोलिस मोक्कांतर्गत कारवाई करणार असल्याचे मला पोलिस अधिकाऱ्यांकडून समजले आहे, त्यात जन्मठेपेची शिक्षा होते. माझे अधिकाऱ्यांसोबत बोलणे झाले असून मोक्काची कारवाई होऊ द्यायची नसेल, तर अधिकाऱ्याने एक लाख रुपयांची मागणी केल्याचे त्याने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून या कुटुंबाने त्याला एक लाख रुपये दिले. काही दिवसांनी त्याने पुन्हा रणसिंग कुटुंबाची भेट घेत उच्च न्यायालयात जामीन मांडण्यासाठी वकील दिला असून त्याच्या फी पोटी एक लाख रुपये घेतले.

पुन्हा काही दिवसांनी त्याने पोलिसांनी चार्जशीट लवकर दाखल करण्यासाठी एक लाखाची मागणी केल्याचे व उच्च न्यायालयातील वकीलाने उरलेली फी मागितली असल्याचे सांगत त्या पोटी एक लाख रुपये स्वीकारले. पुन्हा एकदा त्या कुटुंबाला गाठत मोक्का न लावण्यासाठी बारामतीचे जेलर मदत करत आहेत. त्यांनी वरच्या कार्यालयात गेलेली फाईल माघारी आणण्यासाठी अडीच लाखांची मागणी केल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबाने दोन खोल्या विकत त्यातून १ लाख ६० हजार रुपये जमा केले, उरलेल्या रकमेची तजवीज करून अडीच लाख रुपये थोरात याला दिले. थोरात याने आपण आता न्यायालयात जामिन दाखल करू, परंतु केस मजबूत असल्याने न्यायालयाला मॅनेज करण्यासाठी एक लाखाची मागणी केली. ती रक्कमही या कुटुंबाने दिली.

२६ मार्च रोजी त्याने फिर्यादीला बोलावून घेत यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादीच्या वडीलांचे बनावट पत्र दाखवले. त्यात केस माघारी घेत असल्याचा उल्लेख होता. या पत्रावर पोलिस ठाण्याचा गोल शिक्का, पोलिस निरीक्षकांचा शिक्का, सही व इंग्रजीत रिमार्क असल्याने रणसिंग यांचा विश्वास बसला. त्यावर थोरात याने पोलिसांना मॅनेज करावे लागेल, अन्यथा जामीन मिळणार नाही, असे सांगत दीड लाखांची मागणी केली. ही रक्कमही फिर्यादीने थोरात व त्याची पत्नी पल्लवी यांना रोख व ऑनलाईन स्वरुपात दिली. ५ एप्रिल रोजी थोरात याने तपासी अधिकाऱ्यांना परस्पर का भेटता, ते चिडचिड करत आहेत. त्यांनी न्यायालयात म्हणणे सादर करण्यासाठी ५० हजाराची मागणी केली असल्याचे सांगितले. यावर शंका आल्याने फिर्यादीने तालुका पोलिस ठाण्यात जात सहाय्यक पोलिस निरीक्षक असलेल्या तपासी अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणातील जामीन अर्जाचे म्हणणे यापूर्वीच न्यायालयात दाखल केले असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे थोरात याने पैसे उकळल्याचे स्पष्ट झाले. फिर्यादीने ही बाब पोलिस अधिकाऱ्यांना सांगितली.

अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. ५० हजारांची रक्कम त्याला देण्यासाठी फिर्यादीने दहा हजार रुपये आणले. त्यात खालच्या बाजूला खेळण्यातील बनावट नोटा ठेवण्यात आल्या. थोरात याला संपर्क करून पोलिस अधिकाऱ्याला देण्यासाठी ५० हजार रुपयांची तजवीज झाली असल्याचे फिर्यादीने सांगितले. पोलिसांनी सापळा रचत पंचांना सोबत घेतले. साध्या वेषात पोलिस फिर्यादीच्या आजूबाजूला थांबून राहिले. गुरुवारी ही रक्कम घेण्यासाठी थोरात हा न्यायालय पार्किंगच्या बाजूला थांबलेला होता. त्याने फिर्यादीकडून ही रक्कम स्विकारताना पोलिसांनी त्याला पकडले. या प्रकरणात थोरात याने साडे नऊ लाख रुपये खंडणी उकळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news