

राहुल हातोले
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात केकच्या विक्रीसाठी मोठमोठी ब्रँडेड दुकाने उभी राहिली आहेत. लोकांच्या पसंतीनुसार वेगवेगळ्या प्रकारातील केक बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये नव्याने आलेल्या पिनाटा व बाँब केकला तरुणांची अधिक पसंती असून, फोटो पुलिंग या प्रकारातील केकची देखील मागणी वाढल्याची माहिती शहरातील विक्रेत्यांनी दिली आहे.
जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस, ख्रिसमस, नवीन वर्ष तसेच अनेक छोट्यामोठ्या कारणांसाठी देखील केक कट करण्याची प्रथा आता रूढ होत आहे. अर्ध्या किलोपासून तर पन्नास किलो पेक्षाहून अधिक वजनाच्या केकची मागणी शहरात होत आहे. राजकीय व्यक्तींच्या वाढदिवसाला दहा ते बारा स्टेप असलेल्या पन्नास किलोपेक्षा अधिक वजनाच्या केकची ऑर्डर विक्रेत्यांना मिळतात. बरेच नागरिक कुत्रे आणि मांजरांचे वाढदिवस केक कापून साजरे करत असल्याचे फोटो सोशल मिडीयावर अपलोड करीत आहेत. याच कारणाने केकला मागणी प्रचंड असल्याचे दिसून येते. तरूण, तरूणी रस्त्याच्या कडेला केक कापून वाढदिवस साजरे करताना दिसतात.
पिनाटा केक: लाकडी हॅमर केकवर आदळून केक कट केला जातो. 600 रूपये किलो.
बाँब केक : बाँबच्या आकाराच्या केकला बसविलेली वात पेटवून कट केला जातो. 700 रू किलो.
फोटो पुलिंग : केक मधोमध वाढदिवस असणार्या व्यक्तीचे फोटो रिल हळूहळू बाहेर ओढले जातात. 750 रुपये किलो.
फोटो फ्रेम : वाढदिववस असणार्या व्यक्तिचा फोटो केकवरच प्रिंट करून दिला जातो. 500 रूपये किलो.
कार्टुन्स फ्रेम: मुलांच्या वाढदिवसाला आवडणार्या छोटा भिम, डोरेमोन, सिंच्यान, ऑगी अॅन्ड कॉकरोच व पिंक पँथरसारखी चित्रे केकवर छापली जातात.
जून आणि डिसेंबर महिन्यात प्रत्येकी दोन ते तीन हजारांहून अधिक केकची विक्री होते. जून महिन्यात कुटूंबातील ज्येष्ठांचे वाढदिवस अधिक असतात, तर डिसेंबर महिन्यात ेखील अधिक वाढदिवस आणि ख्रिसमससाठी केकची मागणी वाढलेली असते.
-आशिष झोपे, विक्रेता, रावेत.