

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : अब्जाधीश अॅलन मस्क यांच्या टेस्ला समूहांतर्गत न्यूरालिंक या स्टार्टअपने मानवी मेंदूत शस्त्रक्रियेच्या माध्यमातून चिप बसविण्यात अखेर यश मिळविले आहे. ही चिप एका लहानशा नाण्याच्या आकाराची असून ती मानवी मेंदू आणि संगणकादरम्यान थेट संवाद प्रस्थापित करणार आहे.
अर्थात या चिपची (एक डिव्हाईस) मानवी चाचणी अद्याप व्हायची आहे. ती यशस्वी झाली म्हणजे या चिपच्या माध्यमातून द़ृष्टिहीन लोक हे सुंदर जग बघू शकतील आणि अर्धांगवायूचे रुग्ण चारचौघांसारखे चालू शकतील. न्यूरालिंकने या चिपचे नामकरण लिंक असे केले आहे. या चिपच्या माध्यमातून रुग्ण विचार करेल आणि त्याआधारे फोन, संगणकासह अनेक डिव्हाईसेसचे संचालन करू शकेल. दिव्यांग बांधवांसाठी हे संशोधन वरदान ठरेल. सुरुवातीला त्यांच्यासाठीच ही चिप उपलब्ध करून दिली जाईल.
स्टिफन हॉकिंग असते तर…
कल्पना करा, महान शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग आज हयात असते तर या चिपच्या मदतीने सत्वर डिव्हाईसेस हाताळू शकले असते, अशी भावना प्रयोगाच्या प्राथमिक यशानंतर टेस्लाचे अॅलन मस्क यांनी व्यक्त केली.
मानवी चाचणी लवकरच
सप्टेंबर 2023 मध्ये मस्क यांना इंडिपेंडन्ट इन्स्टिट्युशनल रिव्ह्यू बोर्डाने या प्रयोगासाठी परवानगी दिली होती. न्युरालिंक आता लवकरच मानवी चाचणी सुरू करेल.
चाचणी कुणावर होणार?
न्यूरालिंकच्या माहितीनुसार सर्व्हायकल स्पायनल कॉर्डमध्ये (पाठीच्या कण्याला) इजा झालेल्या अथवा एमियोट्रोफिक लेटरल स्क्लेरोसिसमुळे (एएलएस) क्वाड्रिप्लेझिया (दोन्ही हातांना व दोन्ही पायांना झालेला पक्षाघात) झालेल्यांवर या चिपची चाचणी होईल. रुग्णांचे वय किमान 22 वर्षे अपेक्षित आहे. अध्ययन पूर्ण होण्यास किमान 6 वर्षे लागतील. यादरम्यान चाचणीत सहभागी असलेल्यांना येण्या-जाण्याचा खर्च दिला जाईल.
न्यूरालिंक चिप असे काम करेल
1) फोनला थेट मेंदूशी जोडणार. 2) मेंदूच्या कार्याचे नियमन करणार. 3) अर्धांगवायूपीडित व्यक्ती मेंदूत चिप बसविल्यानंतर केवळ विचार करून माऊसचे कर्सर हवे तसे फिरवू शकतील. 4) चिपला चार्जिंग करावे लागणार. वायरलेस चार्जरही कंपनीने डिझाईन केले आहे.