देशी बियाणांच्या रक्षणाची गरज

देशी बियाणांच्या रक्षणाची गरज
Published on
Updated on

कोरोनातील लॉकडाऊनमुळे प्रवासावर निर्बंध आले आणि त्यामुळे शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शेतकरी अधिक उत्पन्नापोटी हरित क्रांतीच्या काळात संकरित बियाणांकडे वळले. संकरित बियाणांमधून उगवलेले अन्नधान्य रोगास निमंत्रण देणारे ठरत आहे. त्यामुळे पुन्हा देशी बियाणांकडे वळण्याची गरज आहे.

ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील आदिवासी महिलांकडून पिढ्यान्पिढ्या स्वदेशी बियाणांचे केले जाणारे संरक्षण सुखावणारी बातमी आहे. कंधमालच नव्हे, तर मध्य प्रदेशातील बालाघाट, महाराष्ट्रातील अहमदनगर, पश्चिम बंगालचे झारग्राम आणि राजस्थानातील बान्सवाडा जिल्ह्यातही पारंपरिकरीत्या चालत आलेल्या स्वदेशी बियाणांची साठवण काही व्यक्ती आणि कुटुंबांकडून केली जाते. स्वदेशी बियाणांचा उपयोग हा अनेक प्रकारे पर्यावरणपूरक, आर्थिक आणि खाद्य सुरक्षेच्या द़ृष्टीने लाभदायी आहे. त्यामुळे लोकांचा याकडे ओढा वाढला आहे. पारंपरिक वाण म्हणजे, स्वतः शेतात पिकवलेल्या पिकातील काही भाग बियाण्यांसाठी राखून पुढील वर्षाच्या पेरणीसाठी वापरणे. असे वाण (बियाणे) कुठलीही रासायनिक प्रक्रिया न करता किंवा किरणोत्सर्गी प्रक्रिया न करता पुनरुत्पादन करण्यासाठी वापरले जाते. पारंपरिकरीत्या बियाणांची साठवण करणारे सांगतात की, स्वदेशी बियाणांमुळे शेतीवर कमी खर्च येतो. जगभरात महिला सक्षमीकरण करणारे गट आणि स्वयंसेवी संस्था यांच्याशी समाजाची जवळीकता वाढलेली असताना दुसरीकडे स्वदेशी बियाणांच्या संरक्षणावरूनही चिंता वाढली आहे. जगभरातील अनेक लहान- मोठ्या खाद्य संघटना या गोष्टींवर विचार करत आहेत. स्वदेशी बियाणांचा संबंध हा खाद्य सुरक्षेशी कितपत असतो, यावर विचार केला जात आहे.

स्वातंत्र्यास 75 वर्षे झाल्यानंतरही भारतात दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात बंदिस्त असलेल्या आत्मकेंद्रित समाजाच्या पारंपरिक ज्ञानाची दखल घेतली गेली नाही आणि त्याची सरकारी दरबारी नोंदही झाली नाही. आता त्याची गरज सर्वांनाच वाटू लागली आहे. स्वदेशी बियाणांचे महत्त्व वाढू लागले आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे प्रवासावर निर्बंध आले आणि त्यामुळे शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु, त्याचवेळी विदर्भ-मराठवाड्यातील ग्रामीण भागात स्वदेशी बियाणांचा पुरेसा नव्हे, तर गरजेपेक्षा अधिक साठा होता. यादरम्यान मध्य प्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक लहान खेडे कोंभळणे येथे बीज बँकेची पायाभरणी झालेली होती. या माध्यमातून त्यांनी बियाणासंदर्भातील एक संदेश देशातील ग्रामीण जनतेला दिला.

महाराष्ट्रातील बीजमाता राहिबाई पोपरे यांची देशी बीजसंवर्धनाबाबतची यशोगाथा प्रेरणादायी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामधील कोंभाळणे या खेडेगावात राहणार्‍या राहिबाईंना गावात कुपोषण, आजारपणाच्या घटना वाढताहेत हे लक्षात आल्यानंतर त्यामागे काय कारण असावे, हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता. संकरित बियाण्यांचा विपरीत परिणाम लोकांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर होत असावा, असं त्यांचं मन सांगत होतं. म्हणून त्यांनी आपल्या परीने त्यावर एक उपायही शोधला. तो उपाय होता, पारंपरिक वाणांचा.

झटपट पीक मिळवण्याच्या अट्टहासापायी शेतकरी संकरित बियाण्यांचा अधिकाधिक वापर करू लागले. यामुळे उत्पन्न वाढले, मात्र जमिनीपासून ते खाणार्‍या व्यक्तीच्या आरोग्यापर्यंत अनेक दुष्परिणाम दिसू लागले. या संकरित बियाण्यांमुळे पारंपरिक, गावरान वाणांच्या वापराकडे, जतनाकडेही दुर्लक्ष झाले. धानाची जननी करहनीला तर सर्वाधिक फटका बसला. त्याची खासियत म्हणजे, कोंब फुटण्यापूर्वीच ते पिकते आणि पाऊस पडला नाही, तर शेतकर्‍यांना नुकसानदेखील सहन करावे लागत नाही. अहमदनगर जिल्ह्यात कोंभळणे गावात सध्या संकरित बियाणांविरुद्ध महिला शेतकरी या बीज स्वातंत्र्य नावाचे अभियान राबवत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या डाळी, भाजीपाला, तांदूळ, औषधी वनस्पती आणि अन्य पिकांचे सुमारे 200 स्वदेशी बियाणांचे संरक्षण केले गेले आहे. त्यामुळे या गावाला राष्ट्रीय ओळख मिळाली आहे.

– श्रीकांत देवळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news