

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील १२९ वे सुक्त हे 'नासदीय सुक्त' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये सृष्टीच्या निर्मितीच्या आधीची स्थिती वर्णन केलेली आहे, तसेच हे ब्रह्मांड का व कसे अस्तित्वात आले, याविषयीचे कुतूहल किंवा जिज्ञासाही व्यक्त केलेली आहे. वेदांतामध्ये म्हणजेच उपनिषदांमध्ये सृष्टीचे हे गूढ उकलले आहे. सर्व नाम-रूपांच्या आधीचे जे मूळ व एकमेवाद्वितीय श्रेष्ठ तत्त्व आहे, त्याला उपनिषदांमध्ये 'ब्रह्म' अशी संज्ञा दिलेली आहे. (Navratri 2023) हे ब्रह्म शाश्वत, ज्ञानमय, अनंत, नाम-रूपरहित असे परमचैतन्य आहे. छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे की, या परब्रह्माने 'एकोऽहम बहुस्याम' (मी एक आहे, आता बहु व्हावे) असे ईक्षण केले व त्या एकामधूनच विविध नाम रूपांची ही निर्मिती झाली. अर्थात, ही निर्मिती आपण 'बहु' व्हावे या संकल्पातूनच जी माया प्रकटली होती तिनेच मूळ ब्रह्म रूपापासून, त्याचेच निमित्त व उपादान कारण बनवून केली. याचा अर्थ ही जी साकार सृष्टी आपण पाहतो, ती या जगदंबेचीच नवरात्रौत्सव निर्मिती आहे. सर्व व्यवहार, चलनवलन हे मायेमुळेच घडते. निराकारातून साकार अरुपातून रूप, निर्गुणातून सगुण निर्माण करणारी ही जगदंबा आहे. त्यामुळेच या आदिमायेला 'जगत्जननी' असे म्हटले जाते. सर्व देवीरूपे, शक्तीरूपे ही त्या एकाच जगदंबेची रूपे मानली जातात. नवरात्रीमध्ये याच आदिमायेची, आदिमातेची उपासना केली जाते, तिचा जागर केला जातो. (Navratri 2023)
तात्त्विकदृष्ट्या या मायेचे अनेक प्रकारचे वर्णन पाहायला मिळते. मुळात ही माया कशी आहे, याचे वर्णन सर्वसाधारणपणे 'अनिर्वचनीय' नावाच्या ख्यातीने केले जाते. 'अनिर्वचनीय' म्हणजे 'सत् व असत् यापेक्षा विलक्षण' किंवा 'जिचे नेमकेपणाने वर्णन करता येत नाही अशी'. अर्थात, हा जगत्रूपी संसार भासत असला तरी ब्रह्मज्ञान झाल्यावर तो मिथ्या आहे, याची जाणीव होते. 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या' असे आद्य शंकराचार्यांनी म्हटले होते. शंकराचार्यांचे आजेगुरू गौडपादाचार्य यांनी तर जगताची उत्पत्तीच न मानणारा 'अजातवाद' सांगितला आहे. अर्थातच हे जगत अशाश्वत, क्षणभंगुर आणि सतत परिवर्तनीय आहे. गीतेतही या जगताला 'दुःखालयम् अशाश्वतम्' असे म्हटले आहे.
सांख्य तत्त्वज्ञानात 'प्रकृती आणि पुरुष' अशा संज्ञा आहेत. ही प्रकृती विविध तत्त्वांनी बनलेली असते व ती जड आहे. चिनी तत्त्वज्ञानातही याच अर्थी 'यिन व यांग' अशा संज्ञा आहेत. गीतेत अष्टधा प्रकृतीचे वर्णन असून, त्यामध्ये पंचमहाभूते, मन, बुद्धी व अहंकार यांचा समावेश होतो. अर्थात, प्रकृती जड असली तरी तिची अधिष्ठात्री देवता ही सगुण ब्रह्मच आहे. तेच देवीरूप, ब्रह्मशक्ती आहे. ब्रह्म आणि ब्रह्मशक्ती ही वेगळी नसून एकच आहे, हे आदिशंकराचार्यांनाही भगवतीने वाराणसीमध्ये एका प्रसंगातून दाखवून दिले होते. या जगदंबेचे केन उपनिषदात 'उमा हैमवती' रूपात वर्णन आहे. हिमालयाची कन्या पार्वतीचे किंवा सोन्याच्या अलंकाराने नटलेल्या देवीच्या रूपातील हे वर्णन आहे, जी इंद्रादी देवतांनाही ब्रह्मस्वरूपाचे रहस्य उलगडून दाखवते.
सर्वसाधारणपणे देवीचे भक्त हे देवी भागवत पुराणातून देवीचे स्वरूप समजून घेत असतात. या पुराणावर भागवत महापुराणाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. भागवताप्रमाणेच यामध्येही बारा स्कंध आहेत. भागवत पुराणातही नंद-यशोदेची कन्या व श्रीकृष्णाची बहीण म्हणून विशेष अवतरलेल्या तसेच कंसाच्या हातातून निसटून अष्टभुजेच्या रूपात प्रकट झालेल्या देवीचे वर्णन आहे. देवी भागवतात महिषासुर, चंड-मुंड, रक्तबीज, शुंभ-निशुंभ यांसारख्या आसुरांचा वध करणाऱ्या भगवतीच्या कथा आहेत.
महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, दुर्गा, चंडिका, अंबिका, शाकंभरी अशी विविध नामे देवीने धारण केलेली आहेत. दश महाविद्यांमध्ये काली, तारा, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, भैरवी, धुमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला यांचा समावेश होतो. पिंडी ते ब्रह्मांडी अशा सर्व ठिकाणी जी शक्ती आहे, ती प्रत्येकाच्या शरीरात कुंडलिनी स्वरूपात असते, असे मानले जाते. दक्ष प्रजापतीची कन्या व शिवपत्नी सतीने देहत्याग केल्यावर विष्णुचक्राने तिच्या देहाचे तुकडे केले. हे तुकडे पृथ्वीवर जिथे जिथे पडले, तिथे शक्तिपीठे निर्माण झाली. कालांतराने हीच सती हिमालयाची कन्या पार्वतीच्या रूपाने पुन्हा जन्मली व तिने पुन्हा शिवालाच वरले. महाराष्ट्रात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी, माहुरची रेणुका व वणीची सप्तश्रृंगी देवी ही शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या जगत्जननीला, मातृरूपाला त्रिवार वंदन!