

नवी मुंबई ; पुढारी वृतसेवा : कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर वाहतूक कोंडी ही कल्याणकरांच्या पाचवीलाच पुजली आहे. आज (बुधवार) सकाळी नऊ वाजून 25 मिनिटांच्या सुमारास मुंबई महापालिकेच्या एलटीएमजी रूग्णालय सायनची रक्तपेढीची बस या वाहतूक कोंडीमध्ये अडकली. आजूबाजूने वेढा घातलेल्या रिक्षांच्या कोंडीतून मार्ग काढत ही रक्तपेढीची बस रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभी राहिली. कल्याणची ही वाहतूक कोंडी कधी सुटेल आणि कल्याणकर कधी एकदाचा सुटकेचा निश्वास सोडणार हे आता तरी सांगता येणार नाही.
कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर सकाळपासूनच कल्याणकरांसह लांबपल्याच्या एक्सप्रेस, मेलने प्रवास करून उतरणा-या प्रवाशांना ही सामना करावा लागतो. रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर कल्याण बस स्थानक, मुरबाडकडे जाणा-या मार्गावर रिक्षाची भलीमोठ्ठी रांग, रेल्वे स्टेशनची पायरी उतरताच रिक्षांचा गराडा, लागूनच भिवंडी, गोवा, कोनगाव शेरिंग रिक्षांच्या बेशिस्तपणे उभ्या केलेल्या रिक्षा, कल्याण बस स्थानकातून सुटणा-या एसटी, एनएमएमटी आणि केडीएमटीच्या बसेस. त्यातच पदपथावर अनधिकृत मांडलेला बाजार आणि त्यातून मार्ग काढत कल्याणकरांच्या सकाळच्या प्रवासाला सुरूवात होते.
काही अंतरावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे आणखी वाहतूक कोंडी होताना दिसून येते. त्यात वाहनचालकांचा आडमुठेपणामुळे वाहने अगदी रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवल्याने दोन ते तीन वाहने एकमेकांना चिकटून चालतात. मात्र आज (बुधवार) त्याचा फटका मुंबई महापालिका रक्तपेढीच्या बसला ही बसला. सायरन वाजून देखील बसला निघण्यासाठी मार्ग मोकळा मिळत नसल्याचे पाहुन रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या तीन चार रिक्षाचालकांनी अखेर या बसला मार्ग मोकळा करून देण्यासाठी परिश्रम घेतले.
ही वाहतूक कोंडी इथेच संपत नाही, तर थेट कोनगाव टोलनाक्यापर्यंत तर कल्याण सोडून पत्रीपूल, मानपाडा आणि डोंबिवली एमआयडीसी हद्द पार करेपर्यंत सकाळी असते. कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर पदपथावर बसलेल्या विक्रेत्याला काही बोलल्यास थेट शिवीगाळ आणि हमरीतुमरीपर्यंत मजल जाते. रिक्षाचालकांच्या बाबतीत अवघड परिस्थितीमध्ये प्रवाशांना प्रवास करावा लागतो. एखाद्या प्रवाशांचा वाद झाल्यास थेट दमदाटी केली जाते. वाहतूक पोलीस, कल्याण आरटीओ यांचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. मोहीम हाती घेऊन कारवाई केल्याचे कधी ही दिसून येत नाहीत. यामुळे ही चारही बाजूने वाहतूक कोंडीचा सामना कल्याणकरांच्या पाचवीला पुजलेला आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.
हेही वाचा :