

मानवाचे निसर्गाशी असलेले संबंध दुरावत आहेत. झाडे, पशू, पक्षी यांचे मात्र निसर्गाशी असणारे नाते अजूनही घट्ट आहे. त्यामुळे निसर्गातील बदलांबाबत हे घटक संवेदनशील आहेत आणि त्याप्रमाणे ते संकेत देतात. त्यानुसार या वर्षी पाऊस कमी, हे लक्षात घेऊन धावणार्या पाण्याला, चालणार्या पाण्याला थांबायला आणि थांबलेल्या पाण्याला मुरवायला लावले पाहिजे, तरच येणार्या वर्षात पाणी मिळू शकेल.
यंदाचा मान्सून वेळेवर येणार, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. पाऊस वेळेवर येणार या अपेक्षेने शेतकरी खूश झाला. उन्हाळा कडक होता; मात्र तापमान जेवढे वाढणे अपेक्षित होते, तितके वाढले नाही. त्यामुळे उन्हाळा सुसह्य होता. उन्हाळा सुरू असतानाच अवकाळी पावसाचे ढग जमले. अवकाळी तो अवकाळी. बेभरवशाचा! कोठे पडला, कोठे नाही. तो मनाचा मालक. काही ठिकाणी नद्या-नाले तुडुंब भरून वाहिले, तर काही ठिकाणी पूर्ण पाठ फिरवली. तरीही उन्हाळा सुसह्य राहिला. त्यानंतर बिपरजॉय नावाचे वादळ अनेक घरे, उद्योगधंदे आणि आस्थापना उद्ध्वस्त करत गेले. या वादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे केरळपासून कोकणापर्यंत आलेला मान्सून पुढे सरकायचे नाव न घेता, आहे तिथेच राहिला. आता बिपरजॉय शांत झाले तरी अजूनही महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पावसाची वाट पाहत बसला आहे. पावसाची अजून कोणतीच चिन्हे नाहीत.
याला कोणी अल निनोचा परिणाम सांगत आहे. कोणी वाढत्या तापमानाकडे बोट दाखवत आहे. पावसाच्या उशिरा येण्याबद्दल अनेक कारणे चर्चेत आहेत. मात्र पाऊस उशिरा येणार याबद्दल निसर्गातून वारंवार संकेत मिळत होते. निसर्गाच्या मिळणार्या संकेतात अचूकता आहे, यात वाद नाही. मात्र या अभ्यासाला संख्याशास्त्रीय आधार नाही. कोणी याचा वर्षनिहाय अभ्यास करून नेमके निष्कर्ष मांडलेले नाहीत. मात्र हे निसर्गसंकेत अचूक आढळतात. निसर्गातील पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वनस्पती पर्जन्यासंदर्भात अंदाज वर्तवता येईल इतपत त्यांचे वर्तन बदलतात.
यावर्षीचे संकेत शास्त्रीय अभ्यासातून व्यक्त केलेल्या अंदाजावर फुली मारणारे दिसून येत आहेत. निसर्गातील सजीवांचे वर्तन सुरुवातीपासून वेगळे आहे. त्यामुळे शास्त्रीय अंदाज खरे ठरणार नाहीत, असे वाटत होते. तेवढ्यात अगदी सुरळीत प्रवास करणार्या मान्सूनला बिपरजॉयचा तडाखा बसला आणि मान्सूनची वाटचाल रोखली गेली. निसर्गाचे संकेत अनेक ग्रंथांत आहेत. त्याचप्रमाणे लहानपणी वाडवडिलांच्या तोंडीही ऐकावयास मिळत. आजही भटक्या आणि विमुक्तांतील प्रत्यक्ष भटकंती करणारे अनेक लोक निसर्गाचे हे नेमके संकेत सांगतात.
पक्ष्यांमध्ये कावळा, चातक, पावशा, तितर, टिटवी हे पक्षी पावसाचे संकेत देतात. या वर्षी कावळ्यांची घरटी अजूनही दिसत नाहीत. कावळा फांद्यांच्या बेचक्यात आणि छोट्या लाकडांच्या, काटक्यांच्या साहाय्याने घरटे बांधतो. घरटे जर झाडाच्या उंच टोकाला असेल, तर त्यावर्षी अवर्षण असते. मध्यभागी असणारे घरटे चांगल्या पावसाचे संकेत देतात. कावळ्याचे घरटे खालच्या बाजूला असेल, तर अतिवृष्टी किंवा पाऊस जास्त पडतो. कावळ्याच्या घरट्याच्या दिशेवरूनही संकेत मिळतात. पश्चिमेला असल्यास सरासरीएवढा, पूर्वेला असेल तर जास्त, दक्षिण किंवा उत्तरेस असेल तर कमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी अजून घरटेच बांधलेले नाही.
पाऊस वेळेवर येणार असल्यास चातक पक्षी लवकर दिसू लागतात. ते आफ्रिकेतून स्थलांतर करतात. पाऊस उशिरा येणार असल्यास चातकही उशिरा येतो. चातक पक्षी ओरडू लागला की, लवकरच पाऊस येणार याचे संकेत मिळतात. 'पेर्ते व्हा', असे सांगत शेतकर्यांना जागे करणारा पावशा शेतकर्यांचा आवडता पर्जन्यदूत! मात्र तो अवकाळी पावसानंतर कोठे गायब झाला आहे, समजत नाही. काही भागात अवकाळी पाऊस न पडताही त्याचे ओरडणे लुप्त झाले आहे. तितर पक्षी नागरी वस्तीजवळ माळरान असेल तर विपुल प्रमाणात आढळतात. त्यांचे सांकेतिक आवाजात ओरडणे सुरू झाले की ओळखावे, पावसाळा जवळ आला आहे. टिटवी खड्यांना एकत्र करून विशिष्ट पद्धतीने घरटे बनवते. एप्रिल, मेमध्ये या जमिनीवरील घरट्यात ती अंडी घालते. टिटवीने घातलेल्या अंड्यांची संख्या तीनपेक्षा जास्त असेल तर पावसाळा चांगला असतो. त्यापेक्षा कमी असतील तर कमी पावसाचे संकेत मिळतात. हे घरटे उंचावर असेल तर पावसाळा चांगला असतो. यावर्षी टिटवीची घरटी तळ्याच्या पाणी संपलेल्या भागात आढळून आली. त्यातही दोनपेक्षा जास्त अंडी दिसली नाहीत. चिमण्या मातीत अंग घुसळतात आणि पाऊस येणार असल्याचे संकेत देत असतात. मात्र अजून चिमण्यांना पावसाची चाहूल लागली नसावी. भरपूर धुळीचे रान दररोज पाहतो; मात्र अजून चिमण्यांना मातीने अंघोळ करताना या वर्षी पाहता आलेले नाही. यातून पावसाळा उशिरा येणार आणि पाऊस कमी असणार, याचे संकेत मिळतात.
अनेक प्राणीही पावसाचे संकेत देतात. पाऊस कमी येणार असेल तर त्या वर्षी हरणे पिल्लांना जन्म देत नाहीत. वाघीण दुष्काळाच्या संकेताला लक्षात घेऊन पिल्लांना जन्म देत नाही. जंगलातील ही निरीक्षणे करता आलेली नाहीत. तर खेकडे आणि माशांच्या हालचालीवरून कोळी बांधव पावसाचे अंदाज बांधतात. काळ्या मुंग्यांचा समूह तोंडात अंडी घेऊन स्थलांतर करताना पाहिला की, पूर आल्यानंतर होणारे माणसाचे स्थलांतर आठवते. मात्र या वर्षी अजून अशा मुंग्यांच्या हालचाली कोठे दिसत नाहीत. म्हणजेच मोठ्या पावसाची शक्यता एवढ्यात नाही. वाळवीला पंख फुटून ती आकाशात उडू लागली की, लगेच लक्षात येते कारण त्यांना पकडण्यासाठी इतर पक्षी त्याठिकाणी झेपावतात. 'वाळवी उडाली आकाशी' हे चित्र या वर्षी अद्याप पाहता आलेले नाही. जोरात पाऊस येण्याची शक्यता असल्यास सरपटणारे प्राणी सुरक्षित जागा शोधत असतात. मात्र साप आणि नागांचे दर्शन, जे एरवी सहज होत असते, तेही अजून होत नाही.
मला या सर्वात महत्त्वाचे वाटतात, ते झाडांकडून मिळणारे पावसाचे संकेत! या वर्षी झाडांकडून मिळालेले संकेत विचित्र आहेत. बहावा हे यातील महत्त्वाचे झाड. फेब्रुवारी अखेरीस बहाव्याच्या कळ्या बाहेर पडू लागल्या की, जूनमध्ये पाऊस येणार हे कळू लागते. हल्ली बहावा मार्चमध्ये फुलतो आणि पाऊस हा जुलैमध्ये येतो. मात्र या वर्षी बहाव्याचे फुलणे हे फुलणे नव्हते. क्वचित पाणी मिळणार्या ठिकाणचा बहावा फुलला, मात्र तो बहावा वाटलाच नाही. कोठेतरी आलेल्या कळ्या पाहून, कोठे गेला तो पितांबर नेसलेला बहावा? असा प्रश्न पडला. बरं, उशिरापर्यंत बहावा फुलत राहिला, असेही नाही. त्यामुळे या वर्षी बहावाचे फुलणे कमी पावसाचे संकेत देत आहे.
चिंचेच्या झाडांचे फुलणेही या वर्षी पाऊसमान बेताचे असल्याचा संकेत देते. तर गुलमोहोर विना पानांचा फुलतो. त्याचे तेच रूप सर्वांना भावते. मात्र यावर्षी गुलमोहोर पानांसह फुलला आहे. अजूनही गुलमोहोराचे फुलणे सुरूच आहे. अनेक वनस्पती पाऊस कमी पडणार असेल तर जास्त फुलतात. त्यांना फलधारणाही मोठ्या प्रमाणात होते. कमी पावसामुळे आपण जगू किंवा नाही, माहीत नाही. मात्र आपला वंश वाढला पाहिजे, या हेतूने झाडांची ही धडपड असते. बिब्बा, खैर आणि शमीची झाडे जास्तच फुलल्यास कमी पाऊस पडतो. आंबे मोठ्या प्रमाणात आले की, पावसाळा बेताचा असतो. चिंचेच्या झाडांचे मात्र उलट असते. अतिवृष्टीने फुले आणि कोवळ्या चिंचा मोठ्या प्रमाणात गळतात. त्यामुळे पावसाळा चांगला असलेल्या वर्षी चिंच जास्त फुलते. धामणीची झाडे पाऊस येण्याअगोदर एक महिना फुलतात. मात्र यावर्षी अजूनही झाडे फुललेली नाहीत.
पूर्वीपासून अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे 1990 पर्यंत पावसाळा नियमित होता. मात्र जसे जागतिक तापमान वाढ, प्रदूषण यातून अनेक प्रजाती नष्ट होत आहेत तसतसे निसर्गचक्र बदलत चालले आहे. कालिदासाने 'मेघदूता'त केलेल्या 'आषाढस्य प्रथम दिवसे…' या वर्णनावरून त्या काळात आषाढ महिन्याच्या प्रथम दिवशी पाऊस येत होता. काही वर्षांपूर्वी सात जूनला महाराष्ट्रात पाऊस यायचा. आता हे चक्र बदलत आहे आणि निसर्गातील पावसाचे संकेत देणारे सर्व घटक तसेच कार्यरत आहेत.
मानवाचे निसर्गाशी असलेले संबंध दुरावत आहेत. झाडे, पशू, पक्षी यांचे मात्र निसर्गाशी असणारे नाते अजूनही घट्ट आहे. त्यामुळे निसर्गातील बदलांबाबत हे घटक संवेदनशील आहेत आणि त्याप्रमाणे ते संकेत देतात. त्यानुसार या वर्षी पाऊस कमी, हे लक्षात घेऊन धावणार्या पाण्याला, चालणार्या पाण्याला थांबायला आणि थांबलेल्या पाण्याला मुरवायला लावले पाहिजे, तरच येणार्या वर्षात पाणी मिळू शकेल.
डॉ. व्ही. एन. शिंदे