

विजयवाडा ; वृत्तसंस्था : गेल्या आठवड्यात गुजरातमधील मुद्रा बंदरावर जप्त करण्यात आलेल्या 20 हजार 900 कोटी रुपये किमतीच्या हेरॉईन साठ्याची तार आंध्र प्रदेशातील विजयवाड्यापर्यंत भिडली असल्याचे निष्पन्न झाले आहे. एका बनावट कंपनीच्या माध्यमातून टाल्कम पावडरच्या (चेहर्याला लावण्याची पावडर) नावाखाली हेरॉईन तस्करी करण्यात आली होती. अमली पदार्थांचा हा साठा अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात पोहोचला आहे.
गुजरातेत महसूल गुप्तवार्ता संचालनालयातर्फे जप्तीची कारवाई करण्यात आली होती. आशी ट्रेडिंग कंपनीने हा माल मागविला होता. कंपनीचा पत्ता विजयवाडा शहराबाहेरील सत्यनारायणपूर परिसरातील दारबंद घराचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. हे घर आशी ट्रेडिंग कंपनीचे मालक गोविंदराजू दुर्गा यांनी पूर्णा वैशाली नामक महिलेला भाड्याने दिले होते.
महसूल गुप्तवार्ता संचालनालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशी ट्रेडिंग कंपनीचा मोबाईल नंबर हा माचावरम सुधाकर याच्या नावे आहे. सुधाकर हा वैशालीचा पती आहे. तो मूळचा काकीनाड्यातील रहिवासी आहे. आयात-निर्यात परवाना वैशालीच्या नावे आहे. जीएसटी नोंदणी 18 ऑगस्ट 2020 रोजी झालेली आहे. हे दाम्पत्य चेन्नई येथील कोलापकम भागात राहते. तेथून वैशाली हिला ताब्यात घेण्यात आले आहे; पण सुधाकर मात्र फरार झाला आहे.
अफगाणिस्तानातून जहाजातील दोन कंटेनरमध्ये हेरॉईन भरल्यानंतर टाल्कम पावडर म्हणून हा माल इराणमधील बदर अन्वरमार्गे गुजरातेतील मुद्रा बंदरात दाखल झाला.
अफगाणिस्तानची जमीन दहशतवादच नव्हे, तर जगभरासाठी नशाही पिकवते. नशामुक्तीसाठी अमेरिका, ब्रिटन आणि तत्कालीन अफगाण सरकारने मिळून '20 अँटी-नार्कोटिक्स' आस्थापना सुरू केल्या, तेव्हा तालिबान स्वत: अफूच्या व्यवसायात होते. आता सत्ताच तालिबानची आहे आणि अफूवर संपूर्ण बंदी आणली जाईल, हेरॉईननिर्मिती बंद करू, असा तालिबानने दिलेला शब्द किती फसवा आहे, हेही या घटनेतून उघड झाले आहे.
माल गुजरातेत उतरलेला असला आणि तामिळनाडूतील मालकाच्या कंपनीचा पत्ता आंध्र प्रदेशातील असला, तरी मालाची डिलिव्हरी दिल्लीत ठरलेली होती.
– बी. श्रीनिवासुलू, पोलिस आयुक्त, विजयवाडा