चंदीगड; वृत्तसंस्था : हवाईदलात लवकरच महिला अग्निवीरांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा हवाईदलाचे प्रमुख एअर मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी शनिवारी केली. हवाईदलाच्या 90 व्या स्थापना दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चौधरी म्हणाले, यावर्षी तीन हजार अग्निवीर हवाईदलात सहभागी होणार आहेत. ही संख्या आगामी काळात वाढत जाईल.
अग्निपथ योजनेंतर्गत नवीन वर्षापासून हवाईदलात महिलांना संधी देण्याचा विचारही सुरू असून, याबाबतच्या पायाभूत सुविधांचे कामही प्रगतिपथावर आहे. अग्निपथ योजनेंतर्गत भरती हे आमच्यासाठी एक आव्हान असले, तरी त्या माध्यमातून देशातील तरुणांची क्षमता हेरून देशसेवेसाठी त्याचा उपयोग करून घेण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. हवाईदलात प्रथमच वेपन ऑपरेशनल ब—ँच तयार करण्यात येणार असून, ही शाखा सर्वप्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली हाताळण्याचे काम करेल. त्यामुळे सुमारे 3,400 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
हवाईदलाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून याप्रसंगी हवाई योद्ध्यांसाठीच्या नवीन गणवेशाचे अनावरण करण्यात आले. नवीन प्रकारचे बूट, टी शर्ट, वेब बेल्ट, कॅपचा यात समावेश आहे.