रेल्वे दुर्घटनेमागे घातपाताचा संशय

रेल्वे दुर्घटनेमागे घातपाताचा संशय
Published on
Updated on

बालासोर, वृत्तसंस्था : रेल्वे दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक मंगळवारी घटनास्थळी दाखल झाले असून या दुर्घटनेमागे घातपाताचा संशय असल्याने सीबीआयने स्वतंत्र एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, अपघातातील 278 मृतांपेकी 101 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातात कोरोमंडल एक्स्प्रेसमधील 40 जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

सिग्नलिंग व्यवस्थेत हेतुपुरस्सरपणे अडथळा आल्याचा संशय प्राथमिक चौकशीत आल्यामुळे या घटनेची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. . सीबीआयचे पथक अपघाताच्या कारणांचा तपास करताना इंटरलॉकिंग यंत्रणेत बिघाड झाला की, जाणूनबुजून करण्यात आला याचा छडा लावणार आहे. रेल्वेतील काही अधिकार्‍यांनी इंटर लॉकिंग सिस्टीमशी छेडछाड केली असावी, असा संशय व्यक्त केला आहे. हा प्रकार घातपाताचच असू शकतो ही शक्यता गृहित धरून तपास केला जाणार आहे. त्या अनुषंगाने सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. त्यातही गुन्हेगारी हेतूने कृत्य केल्याबाबतचे कलमही जोडण्यात आले आहे.

पूर्व-मध्य विभागाचे रेल्वे व्यवस्थापक रिंकेश रॉय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, या अपघातात एक हजार 100 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 900 जणांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे; तर 200 जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सीबीआय पथक बालासोरमध्ये घटनास्थळी दाखल झाले असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे. भुवनेश्वर महापालिकेचे आयुक्त विजय अमृत कुलंगे म्हणाले, 193 मृतदेह भुवनेश्वरमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांपैकी 80 जणांची ओळख पटलेली नाही. 55 मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आले आहेत. एम्सच्या डॉक्टरांनी हे मृतदेह सांभाळणे अवघड असल्याचे म्हटले आहे. मृतदेह सडू नये यासाठी लावण्यात येणारा लेपही 80 तासांनंतर काम करत नाही. त्यामुळे डीएनए चाचणी करून लवकरात लवकर हे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करणे किंवा त्यांची विल्हेवाट लावावी लागणार आहे, असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

40 जणांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने

शुक्रवारच्या अपघातात मरण पावलेल्या 278 जणांपैकी किमान 40 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मदत व बचावकार्यात गुंतलेल्या एका पोलिस अधिकार्‍याने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, कोरोमंडल एक्स्प्रेसमधील एका डब्यातील 40 जण विजेच्या धक्क्याने मरण पावले आहेत. अपघातानंतर डब्यात ओव्हरहेड वायरमधून वीज उतरली आणि त्या धक्क्याने हे 40 जण मरण पावले आहेत. त्यांच्या शरीरावर बाकी कुठलीही इजा झाल्याचे दिसत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news