नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू आणि जॉर्ज कुरियन हे मंगळवारी अनुक्रमे राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून झालेल्या पोटनिवडणुकीत राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले. मध्य प्रदेशातील एकमेव राज्यसभेची जागा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुना मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर रिक्त झाली होती, तर राजस्थानची जागा काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल लोकसभेवर निवडून आल्यानंतर राजीनामा दिल्याने रिक्त झाली होती.
राजस्थानमधील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी एक भाजपचा डमी उमेदवार होता. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट होती. अपक्ष उमेदवार बबिता वाधवानी यांचे उमेदवारी अर्ज २२ ऑगस्ट रोजी छाननीदरम्यान रद्द करण्यात आला होता. भाजपचे डमी उमेदवार सुनील कोठारी यांनी शुक्रवारी अर्ज मागे घेतल्याने पोटनिवडणुकीत रवनीतसिंह बिट्टू हे एकमेव उमेदवार राहिले. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्याशिवाय भाजपचे उपाध्यक्ष कांतदेव सिंह आणि अन्य दोघांनी मध्य प्रदेशातून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांनी भाजपचा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. छाननीदरम्यान, अन्य उमेदवारांपैकी एकाचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले आणि अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (२७ ऑगस्ट) सिंह यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे कुरियन यांची बिनविरोध निवड झाली.
याशिवाय बिहारमधून दोन, हरियाणा आणि ओडिशातून प्रत्येकी एका जागेवर बिनविरोध निवड झाली. बिहारमधून उपेंद्र कुशवाह आणि मनन मिश्रा यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर हरियाणातून किरण चौधरी आणि ओडिशातून ममता मोहंता यांची बिनविरोध निवड झाली आहे.