

देशात बहुचर्चित फाईव्ह जी सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोबर रोजी झाले. या पार्श्वभूमीवर येत्या पाच वर्षांत देशातील 56 टक्के मोबाईलधारक फाईव्ह जी सेवेचा वापर करतील, असे निरीक्षण एरिक्सन मोबिलिटीच्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. त्याचबरोबर फोर जी सेवेचे काय होणार, आधीचे सिम निरुपयोगी तर होणार नाही ना, असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले आहेत.
फाईव्ह जीसाठी नवे सिम घ्यावे लागणार नाही. फोर जी सिममध्येच तुम्हीच फाईव्ह जी सेवेचा वापर करू शकता. त्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये आवश्यक सेटिंग ऑन करावे लागेल. रिचार्जही फाईव्ह जी पॅकनुसारच करावा लागणार आहे. अर्थात ही सेवा एअरटेल ग्राहकांसाठी आहे.
वास्तविक सध्या लाँच होणार्या जवळपास सगळेच स्मार्ट फोन फाईव्ह जी सेवा देण्याएवढे कार्यक्षम आहेत. तथापि, फाईव्ह जी सेवेच्या वापरापूर्वी तुमच्या मोबाईलमध्ये फाईव्ह जी सेवा कार्यक्षम असणार आहे की नाही ते तुम्हाला पडताळावे लागेल.
फाईव्ह जी सेवेसाठी सध्याच्या पॅकचा विचार केला तर त्यापेक्षा 30 ते 40 टक्के जादा रक्कम तुम्हाला मोजावी लागेल. अर्थात विविध कंपन्यांनी याबद्दल अजूनही स्पष्ट घोषणा केलेली नाही.
2030 पर्यंत देशातील एकूण कनेक्शनपैकी एक तृतीयांशपेक्षा अधिक फाईव्ह जी असणार. टू जी आणि थ्री जीचा वाटा 10 टक्क्यांहूनही कमी असेल.