नवी दिल्ली : वृत्तसंस्था
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य काळवंडले आहे. युक्रेनमधील अशा विद्यार्थ्यांना देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्याचा विचार सुरू असून, त्यांचा अभ्यासक्रम भारतातच पूर्ण करण्याची संधी देण्याच्या शक्यतांची पडताळणी केंद्र सरकार करत आहे. सरकार आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) अशा विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा परदेशात इतरत्र सामावून घेण्याच्या शक्यतांवर चर्चा करत आहे, जेणेकरून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईल.
मानवतावादी दृष्टिकोनातून या सर्व विद्यार्थ्यांचा विचार करणे गरजेचे आहे. अशा किती विद्यार्थ्यांवर युद्धाचा परिणाम होतो, त्यापैकी किती तिसर्या किंवा चौथ्या वर्षात आहेत आणि सध्याच्या तरतुदी काय आहेत, हे पाहावे लागेल. मात्र, विद्यार्थीहितासाठी सरकार जे जे करता येणे शक्य आहे ते करेल, असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. या विषयावर तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय आयोग, आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोगाच्या सदस्यांची लवकरच बैठक होणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आणखी एका अधिकार्याने संबंधित विभाग यासंबंधीची पडताळणी करत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले.
एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमधून आलेल्या या विद्यार्थ्यांना एक तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेता येईल किंवा इतर देशांतील महाविद्यालयांमध्ये त्यांच्या उर्वरित शिक्षणाची व्यवस्था करता येईल. जेणेकरून ते नीट-एफएमजी (नीट-फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन) पूर्ण करू शकतील. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांवर कोसळलेले संकट लक्षात घेऊन डॉक्टरांच्या काही संघटनांनी 'एनएमसी'ला निवेदने देऊन अशा विद्यार्थ्यांना इतर देशांतील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेता येईल, अशा विशेष तरतुदी लागू करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. या माध्यमातून परदेशी वैद्यकीय पदवीधर (एफएमजी) म्हणून या विद्यार्थ्यांची भारतात प्रवेश परीक्षेसाठी पात्रता सुनिश्चित करेल.
सध्याच्या तरतुदीनुसार, परदेशी विद्यापीठांतून वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना स्क्रीनिंग टेस्ट पास करावी लागते. त्यानंतर त्यांना भारतीय मेडिकल ग्रॅज्युएट समकक्ष म्हणून मान्यता मिळते. त्यामुळे भारतात त्यांना प्रॅक्टिस करता येते. तथापि, परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना दुसर्या वैद्यकीय महाविद्यालयात मायग्रेशनची परवानगी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमात नाही. त्यामुळे युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर सरकार तोडगा काढून त्यांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे. युक्रेनमध्ये कमी खर्चात दर्जेदार वैद्यकीय शिक्षण मिळते. शिवाय, भारतातील सरकारी महाविद्यालयांत जागा मिळवण्यात यश न येणारे अनेक विद्यार्थी असतात. त्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा कल युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याकडे आहे.