सिडनी/अहमदाबाद : वृत्तसंस्था आई हिराबेन यांच्या 99 व्या वाढदिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या मातृगौरवपर ब्लॉगमध्ये अब्बास नावाच्या मुस्लिम बालमित्राचा उल्लेख केला होता. हा उल्लेख राजकीय वर्तुळातही चर्चेचा, वादविवादाचा विषय ठरला.
अब्बास हा माझे वडील दामोदरदास यांच्या मित्राचा मुलगा. वडिलांच्या या मित्राच्या अकाली मृत्यूनंतर अब्बासच्या शिक्षणाचा प्रश्न होता. वडील दामोदरदास हे अब्बासला मग आमच्या घरीच वडनगरला घेऊन आले. आई हिराबा यांनी आम्हा मुलांमध्ये आणि अब्बासमध्ये तसूभर फरक केला नाही, असे पंतप्रधानांनी या ब्लॉगमध्ये नमूद केले होते. त्यावर विरोधकांनी वेगवगेळ्या प्रकारे टीका केली.
'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तर अब्बास कुणी खरोखर अस्तित्वात तरी असेल काय, याबाबत शंका व्यक्त केली होती. अब्बास हे नाव मग सोशल मीडियामध्येही ट्रेंड झाले. माध्यम जगतातील काहींनी अब्बास यांचा मागोवा घेतला असता अब्बास हे सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे राहात असल्याचे समोर आले आहे.
शिवाय दीपल त्रिवेदी या महिलेनेही अब्बास यांच्याबाबतीत एक ट्विट केले असून, ते सोशल मीडियातून कमालीचे व्हायरल झाले आहे. अब्बासभाईंनी माध्यम जगतातील एकाशी गप्पाही केल्या. अब्बासभाई यांनी सांगितले की, मी वडनगरनजीकच्या केसिम्पा गावचा आहे. पंतप्रधान मोदींनी आई हिराबांबद्दलच्या लेखात केलेला माझा उल्लेख 'खरा' या शब्दाइतकाच खरा आहे. मी वडनगरला हिराबांकडे राहूनच शिकलो, सवरलेलो आहे. आजकाल कोण कुणाला लक्षात ठेवते? आई हिराबा आणि भारताचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्रभाईंनी माझी आठवण काढली, मी धन्य झालो अन् रातोरात 'सेलिब्रेटी'ही!
माझे वडील आणि पंतप्रधानांचे वडील दामोदरकाका खास दोस्त होते. वडिलांचे निधन झाले तेव्हा माझ्या मोठ्या भावाने दामोदरकाकांना माझ्या शिक्षणाची अडचण सांगितली. दामोदरकाका म्हणाले, दे अब्बासला माझ्याकडे पाठवून. माझ्यासाठी जसे नरेंद्र, पंकज (पंतप्रधानांचे भाऊ) तसाच अब्बास. पंकजभाई आणि मी एकाच शाळेत, एकाच वर्गात होतो. आजही आम्ही परस्परांच्या संपर्कात असतो.
अब्बासभाई यांनी 1973-74 मध्ये हिराबांच्या घरी राहूनच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर पुढील शिक्षणासाठी ते वीसनगरला गेले. नंतर माणसा या गावी आणि मग अहमदाबादेत शिकले. शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर येथेच स्थायिक झाले.
पुरवठा खात्यातून वर्ग 2 अधिकारी म्हणून निवृत्त झाले. नंतर धाकट्या मुलासह सिडनेला राहायला गेले… अब्बासभाईंचा मोठा मुलगा आजही गुजरातेतील मेहसाणा जिल्ह्यातील खेरालू या गावात राहातो. अब्बासभाईंनी सांगितले, मी जेव्हा हिराबांसोबत राहिलो, त्याआधीपासूनच पंतप्रधान मोदी घरी राहात नसत. त्या काळात त्यांची माझी भेट कधीतरीच होत असे. पंकजभाई नुकतेच खास मला भेटायला म्हणून इथे आलेले होते.
मध्यंतरी 2014 ला मी हज यात्रेला गेलो होतो. तेथून परतलो तेव्हा हिराबांना भेटायला गेलो होतो. त्यांच्यासाठी मी 'जमजम' (हजचे पवित्र जल) आणि जन्नतूल फिरदौस नावाचे अत्तर आणले होते. हिराबांना कोण आनंद झाला होता, असेही अब्बास यांनी सांगितले. पंतप्रधानांनी लिहिले होते, ईदला आई खास अब्बाससाठी गोडधोड बनवत असे.
हेही वाचा