गुवाहाटी/बंगळूर/पाटणा; वृत्तसंस्था : मान्सूनपूर्व वादळी पावसाचे संकट तीन राज्यांवर घोंघावले. एकट्या बिहारमध्ये वीज कोसळून 33 जणांचा मृत्यू झाला. बिहारसह आसाम व कर्नाटकमध्ये मिळून 57 लोक मरण पावले. 24 मे पर्यंत अनेक राज्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 23 मे रोजी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
आसाममध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पुरांचा विळखाच या राज्याला बसलेला आहे. शेकडो गावांना जलसमाधी मिळालेली आहे. राज्याच्या 29 जिल्ह्यांतील सात लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. पिके भुईसपाट झाली आहेत. राज्यात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
बिहारमध्ये शुक्रवारी झालेल्या मुसळधार आणि वादळी पावसात विजांचा कहर होता. राज्यातील 16 जिल्ह्यांत किमान 33 जण कोसळलेल्या विजांच्या तडाख्यात सापडून मरण पावले. मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
बिहारमधील जिल्हानिहाय मृतांची आकडेवारी अशी : भागलपुरा 7, मुजफ्फरपूर 6, सारण 3, लखीसराय 3, मुंगेर 2, समस्तीपूर 2, जहानाबाद 1, खगडिया 1, नालंदा 1, पुर्णिया 1, बांका 1, बेगुसराय 1, अररिया 1, जमुई 1, कटिहार-1, दरभंगा-1
कर्नाटकमध्ये पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांतून 9 जणांचा मृत्यू झाला. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चिकमंगळूर, उत्तर कन्नड, उडुपी, शिमोगा, दावणगिरी, हसन जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.