महिलांच्या लैंगिक छळाविरोधात झीरो टॉलरन्सची गरज : सरन्यायाधीश चंद्रचूड
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महिलांचा लैंगिक छळ, त्यांच्याशी गैरवर्तन, अभद्र भाषेचा वापर तसेच अश्लील विनोदांवर शून्य सहिष्णुता सुनिश्चित करण्याची गरज सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केली. न्यायालयीन भाषा, युक्तिवाद आणि निर्णयांमध्ये महिलांसाठी वापरल्या जाणार्या अयोग्य शब्दांचा एक कोश तयार करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या लैंगिक संवेदना आणि अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. सरन्यायाधीश म्हणाले की, न्यायालयीन कामकाजात महिलांसंबंधी वापरल्या जाणार्या अयोग्य शब्दांचा कोश तयार करणे हे एक मिशन आहे. हा कोश लवकरच प्रसिद्ध होणार असून, केवळ कायदेशीरच नव्हे, तर कामाच्या ठिकाणी महिलांशी भेदभाव का आणि कसा केला जातो, हेही त्या माध्यमातून समजायला मदत मिळेल. निकालांत महिलांसंबंधी आलेले अयोग्य शब्द संकलित करणे, यामागे कोणत्याही न्यायाधीशाचा अपमान करण्याचा उद्देश नसून, काही पूर्वग्रह दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. जोपर्यंत आपण अशा पैलूंबाबत मोकळे होत नाही, तोपर्यंत समाज म्हणून आपला विकास होणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.