

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर देशभरात मुस्लिम बांधवांची निदर्शने सुरू आहेत. झारखंडमधील रांचीसह उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि देशातील इतर ठिकाणी केलेल्या निर्दर्शनावेळी पोलिस आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईचा जमात-ए-इस्लाम हिंदच्या वतीने निषेध करण्यात आला.
उत्तर प्रदेश, झारखंडमध्ये पोलिसांनी केलेली कारवाई लोकशाही आणि कायद्याच्या राज्याचा गळा घोटण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया जेआयएच अध्यक्ष सय्यद सदतुल्ला हुसैनी यांनी दिली. शांततापूर्ण निदर्शने करताना असामाजिक घटक आणि समाजात फूट पाडणार्यापासून मुस्लिम समाजाने सावध राहण्याचे आवाहन देखील हुसैनी यांनी केले. हुसैनी म्हणाले, रांची गोळीबाराच्या स्वतंत्र न्यायिक चौकशीची आणि दोषी अधिकार्याना शिक्षा करावी. ईश्वरनिंदा करणार्या आरोपींवर वेळेवर आणि योग्य कारवाई केली असती, तर या अप्रिय घटना घडल्या नसत्या. बुलडोझर कारवाईची कल्पना सुसंस्कृत समाज करू शकत नाही.