

पाटणा, वृत्तसंस्था : मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसून काँग्रेस खासदार राहुल गांधी विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील तर माझी काही हरकत नसल्याचे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी 2024 निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे वक्तव्य केल्यानंतर नितीश कुमार यांनी आपले मत मांडले आहे.
ते शनिवारी पाटणामध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचे नाव घेतले जात असल्याच्या प्रश्नावरून राहुल गांधी यांच्या नावाला माझी काहीच हरकत नाही, असे नितीशकुमार यांनी हसत उत्तर दिले. ते म्हणाले, भाजपविरोधात सर्व पक्षांनी एकाच व्यासपीठावर येऊन काही ते ठरवावे लागेल.
आम्ही तर वाटच पाहत आहोत. जनता माझ्याकडे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहते; मात्र पंतप्रधान होण्याची इच्छा नाही. देशाच्या विकासासाठी सर्वच विरोधकांनी एकत्र येऊन काम करण्याची इच्छा असून मात्र सर्वांनी एकत्र येऊन धोरण ठरवण्याची गरज आहे.
राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा : कमलनाथ
नवी दिल्ली : राहुल गांधी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी विरोधीपक्ष नेते नव्हे पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत-जोडो यात्रेचेही कमलनाथ यांनी केले. कमलनाथ यांचा नेता काँग्रेस परिवार असल्याचे वक्तव्य सलमान खुर्शिद यांनी केल्यानंतर कमलनाथ यांची एक मुलाखत समोर आली आहे.