

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : धनुष्यबाण या चिन्हावर दावा सांगणार्या शिवसेनेचा ठाकरे व शिंदे गटांच्या याचिकांवर सोमवारी अवघी सात मिनिटे सुनावणी झाली आणि पुढील सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. यामुळे राज्यातील सत्तासंघर्षातील आयोगाचा फैसला पुन्हा लांबणीवर पडला आहे.
जुलैतील पक्षफुटीनंतर शिवसेनेच्या धनुष्यबाणावर दोन्ही गटांनी दावा सांगत निवडणूक आयोगासमोर याचिका दाखल केल्या आहेत. आपापल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ दोन्ही गटांनी लाखो कागदपत्रे आयोगाला सादर केली आहेत. निर्धारित तारखेनुसार सोमवारी सुनावणी होणार होती. सुनावणी झाली देखील, पण ती अवघी सात मिनिटेच चालली. दोन्ही बाजूंचे प्राथमिक युक्तिवाद ऐकून आयोगाने पुढची तारीख दिली. आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या दाव्यांवर सुनावणी होईल. याबाबत अधिक माहिती देताना अनिल देसाई म्हणाले की, धनुष्यबाण चिन्हासह इतर मुद्द्यावर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. या मुद्द्यांवर आज युक्तिवाद होऊ शकला नाही.