देश कोरोना निर्बंधमुक्त

देश कोरोना निर्बंधमुक्त

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट नोंदवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने 31 मार्चपासून सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांनी निर्बंध हटणार असल्याने देशवासीयांना दिलासा मिळणार आहे. परंतु, सोशल डिस्टन्सिंगसह मास्क पुढेही आवश्यक राहील, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

24 मार्च 2020 रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत पहिल्यांदा केंद्र सरकारने कोरोनासंबंधी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यानंतर अनेकदा या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आले होते. नागरिक कोरोनावर आळा घालण्याच्या अनुषंगाने आता अनुकूल व्यवहार करीत असल्याचे मत केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केले आहे.

गेल्या सात आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वेगाने घट दिसून आली आहे. मंगळवारी, 22 मार्चला देशात केवळ 23 हजार 913 सक्रिय कोरोनाबाधित होते. दैनंदिन कोरोना संसर्ग दरदेखील 0.28 टक्के नोंदवण्यात आला. केंद्र तसेच राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांनी आतापर्यंत देशवासीयांना कोरोनाविरोधी लसीचे 181.56 कोटी डोस देण्यात आले आहेत.

सतर्क राहण्याची गरज

कोरोना संसर्गाची प्रकृती लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली, तर संबंधित राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक पातळीवर तत्काळ तसेच सक्रिय कारवाई करणे अपेक्षित राहील. यासंबंधी वेळोवेळी आरोग्य मंत्रालयाकडून सूचना केल्या जातील, असे भल्ला म्हणाले.

logo
Pudhari News
pudhari.news