जनतेची सेवा करणे हीच माझी लायकी : पंतप्रधान नरेंद्र मोदी

जनतेची सेवा करणे हीच माझी लायकी : पंतप्रधान नरेंद्र मोदी

अहमदाबाद, वृत्तसंस्था : गुजरात विधानसभा निवडणुकीत माझी लायकी काय आहे हे कळेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते मधुसुदन मिस्त्री यांनी केले होते. जनतेची सेवा करणे हीच माझी लायकी असल्याचे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. सुरेंद्रनगरमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस नेते म्हणतात मोदींना लायकी दाखवून देऊ. हा त्यांचा अहंकार आहे. मी काही मोठ्या कुटुंबातून आलेला नाही. मी एका सामान्य कुटुंबातील आहे, हीच माझी लायकी आहे. तुम्ही माझी लायकी दाखवू नका. मी एक सेवक, नोकर असून माझी काहीच लायकी नाही काय? विरोधकांनी मला नीच म्हटले, खालच्या जातीचा म्हणून मला हिणवले, गटारीतील किडा म्हटले. मात्र कृपा करून तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला. लायकी दाखवण्याचा खेळ आता तरी थांबवा.

ज्या लोकांना जनतेने सत्तेतून बाहेर हाकलले आहे, ते आता देशभर यात्रा काढून पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न पाहात असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली. नर्मदा योजना तीन दशकापासून रखडून ठेवलेल्या महिलेच्या (मेधा पाटकर) खांद्यावर हात ठेवून काँग्रेस नेते भारत जोडो यात्रा काढत आहे. गुजरातच्या निवडणुकीत नर्मदा प्रकल्पाला विरोध करणार्‍यांना जनतेने पराभूत करून त्यांची जागा दाखवून द्यावी, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

काँग्रेसने नेहमीच जबाबदारी झटकली

पंतप्रधान म्हणाले, काँग्रेस नेते देशभरात भारत जोडो यात्रा काढत आहेत. त्यांनी राजकोटमधील पाणी प्रश्न दूर करण्यासाठी काय केले, असा प्रश्न जनतेने त्यांना विचारावा. काँग्रेस सरकारच्या काळात केवळ गोंधळ घालून जबाबदारी झटकली जात होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news