गरिबांना आणखी पाच वर्षे मोफत रेशन : भाजपचा जाहीरनामा

गरिबांना आणखी  पाच वर्षे मोफत रेशन : भाजपचा जाहीरनामा
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करतानाच केंद्र सरकारने गरिबांसाठी सुरू केलेली मोफत अन्नधान्य योजना पुढील पाच वर्षांसाठीही सुरू ठेवण्याची तसेच आणखी 3 कोटी महिलांना लखपती बनविण्याची 'मोदी गॅरंटी' भाजपने रविवारी घोषित केलेल्या जाहीरनाम्यात दिली. भाजपने सर्वच वर्गातील लोकांसाठी मिळून 24 मोदी गॅरंटी दिलेल्या आहेत. मोदींची गॅरंटी आणि विकसित भारत-2047 संकल्पपत्र, असे या जाहीरनाम्याचे शीर्षक आहे.

गरीब, युवक, अन्नदाता शेतकरी आणि महिला या चार शक्तींच्या बळकटीसाठी काम करण्याचा निर्धार असलेला देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकताही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात रविवारी हा जाहीरनामा घोषित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे संकल्पपत्र प्रकाशित केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक न्यायाच्या लढाईसाठी समर्पित केले. डॉ. आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर जनसंघापासून भाजपचा राजकीय प्रवास सुरू आहे. सत्तेत नसताना आणि सत्तेत असतानाही आमची सामाजिक न्यायाची लढाई सुरूच आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीदिनीच आम्ही हे संकल्पपत्र जाहीर केले, असे भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यावेळी सांगितले.

लाभार्थ्यांना संकल्पपत्राची प्रत

मोदी सरकारने आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात राबविलेल्या योजनांचा लाभ घेणार्‍या विविध क्षेत्रातील लोकांना व्यासपीठावर पाचारण करून त्यांना संकल्पपत्राची प्रत सोपविण्यात आली.

देशभरातून 15 लाख सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जानेवारी रोजी भाजपचा जाहीरनामा तयार करण्यासाठी देशभरातून सूचना मागविल्या होत्या.

रेल्वेचा कायापालट होणार

देशभरात वंदे भारत या खास रेल्वेचा विस्तार केला जाईल. वंदे भारत स्लीपर चेअर कार आणि मेट्रो अशा तीन मॉडेलमध्ये ही रेल्व चालवली जाणार आहे. अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेनचे काम पूर्ण होत आले आहे. उत्तर भारतासह दक्षिण आणि पूर्व भारतातही बुलेट ट्रेन चालवली जाईल, असे मोदींनी सांगितले.

गॅस पाईपलाईनने घरपोच

केंद्र सरकारने आतापर्यंत 4 कोटी लोकांना हक्काची घरे दिली आहेत. राज्य सरकारांकडून गरिबांसाठी घरांची मागणी आल्यामुळे आणखी तीन कोटी घरे बांधण्याचा आमचा संकल्प आहे. आम्ही स्वस्त दरात घराघरांमध्ये गॅस सिलिंडर पोहोचविले होते. आता पाईपलाईनच्या माध्यमातून घराघरात स्वयंपाकाचा गॅस पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे.

चारही शक्तींना आणखी संधी

देशाला भाजपच्या जाहीरनाम्याची प्रतीक्षा असते. गेल्या दहा वर्षांत पक्षाने प्रत्येक वर्गाला गॅरंटी दिली आहे. युवा, महिला, गरीब आणि शेतकरी वर्ग या चार शक्ती विकसित भारताचे मजबूत स्तंभ आहेत. या चारही शक्तींना आणखी संधी देऊन त्यांची गुणवत्ता वाढविण्यावर या संकल्पनाम्यात भर देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

शेतकर्‍यांसाठी खास उपग्रह

शेतकर्‍यांना कीटकनाशाचे विविध प्रयोग, सिंचन, मातीची गुणवत्ता, हवामानाचा अंदाज या कृषी संबंधित सर्व गोष्टींची माहिती मिळविण्यासाठी स्वदेशी बनावटीचा कृषी उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

तीन कोटी महिलांना लखपती बनविणार

केंद्र सरकारने ग्रामीण भागात लखपती दीदी योजना राबवून एक कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. आणखी तीन कोटी महिलांना लखपती बनविण्याचा आमचा निर्धार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आयुष्मान आरोग्य योजनेत 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि तृतीयपंथीयांचाही समावेश केला जाणार आहे. ग्रामीण भागात दूरसंचार क्षेत्राच्या विकासातून दोन लाखांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींना इंटरनेट ब्रॉडबँडने जोडले जाणार आहे.

छोट्या व्यापार्‍यांसाठी विमा योजना

छोट्या व्यापार्‍यांसाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने विमा योजना राबविली जाणार आहे. छोट्या व्यापार्‍यांना आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या दुर्घटनांमधून होणार्‍या नुकसानीपासून संरक्षण दिले जाईल. शिक्षण आरोग्य, पायाभूत सुविधा, क्रीडा, तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक विकास आदी सर्व क्षेत्रातील गॅरंटी या संकल्पनाम्यात सामील करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

मुद्रा ः मर्यादा 20 लाखांवर

मुद्रा योजनेच्या यशामुळे भाजपने आणखी एक संकल्प केला आहे. या योजनेतील कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

मोफत धान्य वाटप पुढेही

गोरगरिबांना मोफत धान्य वाटप योजना पुढील पाच वर्षांपर्यंत सुरूच राहील. शेतकरी, युवा, महिला, छोटे व्यापारी आदी सर्वच वर्गांसाठी 24 गॅरंटी देण्यात आली आहे.

महिलांसाठी वसतिगृहे

औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणार्‍या महिलांसाठी वसतिगृहे बांधली जातील. या वसतिगृहांमध्ये शिशूगृहासारख्या सुविधा राहणार आहेत.

भाजपच्या जाहीरनाम्यात किंवा पंतप्रधानांच्या भाषणातून महागाई आणि बेरोजगारी हे शब्दच आले नाहीत. लोकांच्या जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाजपला चर्चाही करायची नाही, हेच दिसते. – राहुल गांधी, काँग्रेस नेते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news