

बंगळूर; वृत्तसंस्था : देशाच्या संरक्षणाला देण्यात आलेली सगळी आव्हाने भारतीय लष्कराने परतवून लावली आहेत. देशाच्या सीमेवर कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास लष्कर सज्ज असल्याची ग्वाही देशाचे लष्करप्रमुख जन. मनोज पांडे यांनी रविवारी दिली. बंगळूर येथे सैन्य दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते.
जन. पांडे यांनी लष्कराच्या कामगिरीचा आढावा घेतानाच देशासमोरील सुरक्षा आव्हानांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, भारतीय लष्कराने पश्चिम सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी केलेल्या उपायांमुळे घुसखोरीचे प्रमाण घटले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन करण्याचेही प्रकार कमी झाले आहेत. पण सीमेपलीकडे दहशतवाद्यांना पोसणारी यंत्रणा आजही तशीच आहे.
जम्मू काश्मिरातील परिस्थितीबाबत लष्करप्रमुख म्हणाले की, तेथील नागरिकांनी हिंसाचाराला साफ नाकारले आहे. सरकारने विकासाबाबत घेतलेल्या पुढाकारानंतर जनता त्यात सहभागीही होत आहे. दहशतवादी संघटनेच्या मुसक्या आवळण्यात यश आले असले तरी लक्ष वेधून घेण्यासाठी या संघटना नाव बदलून मुद्दाम टार्गेट किलिंगसारखे प्रकार करत आहेत.
15 जानेवारी 1949 रोजी शेवटचे ब्रिटिश लष्कर प्रमुख जन. फ्रान्सीस रॉय बुचर यांनी फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांच्याकडे भारतीय लष्कराची धुरा सोपवली. तेव्हापासून 15 जानेवारी हा दिवस सैन्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतमातेच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणार्यांचे स्मरण केले जाते. मागील 70 वर्षांत प्रथमच सैन्य दिवसाचे विशेष संचलन राजधान दिल्लीबाहेर म्हणजे बंगळूर येथे साजरा करण्यात आला. बंगळूरच्या या सोहळ्याला संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दिनानिमित्त लष्करातील कर्मचारी, माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. आपल्या संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाला सुरक्षित ठेवणार्या या वीरांचा देश कायम ऋणी आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सैन्य दिनाच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे की, सैन्यातील वीरांनी दाखवलेले अतुलनीय शौर्य, धाडस, बलिदान आणि राष्ट्रसेवा याबद्दल देशाला त्यांचा अभिमान आहे.