अवघा लाल किल्ला परिसर ‘छत्रपती’मय

अवघा लाल किल्ला परिसर ‘छत्रपती’मय

आग्रा; सतीश मोरे :  आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे पोवाडे…शिवभक्तांसह दुर्गप्रेमींनी फुललेले रस्ते…रस्त्याच्या दुतर्फा उभारलेले फ्लेक्स… प्रतिमा…शिवजयंतीचे फलक…स्वागत कमानी अन् छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण आग्रा शहर न्हाहून निघाल्याचे रविवारी पाहावयास मिळाले.
आग्रा शहरात प्रवेश केल्यापासून लाल किल्ल्यापर्यंत ते ताजमहाल परिसरातील कंपाऊंडलगत छत्रपतींचे फोटो पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमास उजाळा मिळाला.

अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाऊंडेशन यांच्या प्रयत्नातून यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच आग्रा येथील लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी करायला न्यायालयाने परवानगी दिली. महाराष्ट्र शासन या कार्यक्रमाचा प्रमुख भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा किल्ल्यामध्ये येऊन क्रूर म्हणून ओळख असणार्‍या औरंगजेबाच्या तावडीतून शिताफीने सुटका करून घेतली होती. त्यांच्या या अफाट पराक्रमाची आठवण अवघ्या जगास आहे. या पराक्रमाच्या इतिहासाला उजाळा मिळावा या हेतूने पहिल्यांदाच येथे शिवजयंती करण्यास परवानगी दिल्यामुळे आग्रा शहरातील शिवप्रेमी नागरिक आणि या शहरात राहणारे मराठी व्यवसायिक यांचा आनंद ओसंडून वाहत होता.

छत्रपती शिवाजी महाराज गणेश ट्रस्ट आग्रा आणि व्यापारी मित्र मंडळ आणि गलाई कामगार यांच्या वतीने सकाळी आग्रा किल्ल्यासमोरील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष सर्जेराव देशमुख यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालण्यात आला. हा पुतळा परिसर फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला वेगळे तेज आले होते. सर्व व्यापारी मित्र मंडळ आणि शिवप्रेमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवप्रेमींनी छत्रपतींच्या नावाचा जयघोष करत हा परिसर दणाणून टाकला. दिवसभर या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.

शहरात राहणारे मराठी भाषिक तसेच उत्तर प्रदेश, राजस्थान मधील वेगवेगळ्या भागात राहणारे गलाई कामगार, विद्यार्थी, नोकरदार तसेच फौजी बंधूंनी आज दिवसभरात या आग्रा किल्ल्यासमोर हजेरी लावली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या ट्रॅव्हल्स आग्रा किल्ला समोरून जात असताना त्यामधून छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष ऐकावयास मिळत होता. पुतळा परिसरात आलेल्या प्रत्येक जण शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर वंदन करून ही आठवण आपल्या मोबाईलमध्ये फोटो रूपाने टिपत होता.
किल्ल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे 25 फुटांचे मोठे कटआऊट लावण्यात आले आहे. पुतळा परिसरात सर्वत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदितीनाथ यांचे स्वागताचे बोर्ड लावण्यात आले होते. आग्रा किल्ला परिसराकडे येणारे सर्व रस्ते दोन्ही बाजूला स्वागत कमानीने फुलून गेले होते. आर. आर. पाटील फाउंडेशनचे विनोद पाटील यांचे आभार मानणारे फलक ही काही ठिकाणी पहावयास मिळाले. आग्रा शहरात आणि लाल किल्ल्यामध्ये यापूर्वी एवढा मोठा उत्साह शिवजयंतीवेळी कधी जाणवला नव्हता. प्रत्येक वर्षी येथील मराठी व्यापारी मित्र मंडळ छोट्या प्रमाणात हा उत्सव करतात. मात्र, यावर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून तसेच पुरातत्त्व खात्याच्या माध्यमातून उत्तर प्रदेश सरकारचा पाठिंबा मिळाल्यामुळे शिवप्रेमींचा उत्साह शिगेला गेला होता.

logo
Pudhari News
pudhari.news