

हैदराबादः पालनाडू येथे जगनमोहन रेड्डी यांच्या रॅली मध्ये त्यांचाच कारखाली आल्याने चिरडून एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. वायएसआर काँग्रेसचे नेते व आंध्रपदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची रॅली सुरु होती. पालनाडू जिल्ह्यामध्ये बुधवार १८ जून रोजी ही रॅली सुरु होती. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण आले होते. कार्यकर्ते जगनमोहन रेड्डी यांच्या कारवर चढून घोषणा देत होते. त्याचवेळी एक कार्यकर्ता त्यांच्या वाहनाच्याखाली आल्याने चिरडून गंभीर जखमी झाला त्याला गुंटूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले पण उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला.चीली सिंगैया असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.
पोलिस सुत्रांच्या महितीनुसार 18 जून 2025 रोजी गुंटूर जिल्ह्यातील इटुकुरु गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. पालनाडू जिल्ह्यातील पक्षाचे स्थानिक नेते नागमल्लेश्वर राव यांनी आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबियाच्या सांत्वनासाठी जगनमोहन रेड्डी आले होते. त्यावेळी स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले. ते जगनमोहन रेड्डी यांच्या कारवर फूले उधळत होते तसेच त्यांच्या घोषणा देत होते. जगनमोहनही कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारताना दिसत आहेत. त्याचवेळी सिंगैय्या हे रेड्डी यांच्या कारवर फुले उधळत असताना कारखाली चिरडले गेले. सिंगैया हे पक्षाचे कार्यकर्ते होते असे आता समोर आले आहे. वायएसआरसीपीचे कार्यकर्ते कोरलाकुंटा नागमल्लेश्वर राव यांनी यांनी पोलिस आणि टीडीपी (तेलुगु देसम पक्ष) नेत्यांच्या त्रासामुळे आत्महत्या केली होती. त्यांना सांत्वना देण्यासाठी रॅली काढली होती.
या सर्व प्रकाराचा हिडीओ आता व्हायरल होत आहे. यामध्ये संबधित कार्यकर्ता कारखाली चिरडला जात असल्याचे दिसून येत आहे. तरीही रॅलीच सुरुच राहते. ‘राजकारणाचा असली चेहरा, जनतेपेक्षा मतं किती महत्वाची आहेत’ अशा आशयाचा संदेश या व्हिडीओबरोबर आहे. मात्र, या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी अद्याप झालेली नाही असा दावा वायएसआरसीपी या पक्षाने केला आहे. तसेच हा व्हिडीओ फेक आहे असे म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी तेलगु देसम पार्टीचा प्रयत्न असल्याचा आरोप ही केला आहे.
दरम्यान पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव जगन् मोहन रेड्डी यांच्या रॅलीला परवानगी दिली नव्हती. तरीही रेड्डी हे सांत्वना देण्यासाठी आले व त्यांच्याबरोबर हजारो कार्यकर्ते जमा झाले. या घटनेबाबत आंध्रप्रदेश राज्याचे एक मंत्री गोट्टीपति रवि कुमार यांनी वायएसआरसीपीवर टीका करताना म्हटले की, पक्ष आपल्या प्रचारासाठी लोकांच्या जीवाशी खेळत आहे. तर विरोधकांच्या आरोपांचे खंडण करताना वायएसआरसीपीचे माजी मंत्री अंबाती रामबाबू यांनी ही घटना अतिशयोक्तीपूर्ण सादर केली जात असल्याचे म्हटले. त्यांनी दावा केला की, सिंगैया यांना टक्कर देणारे वाहन जगन यांचे नव्हते, तर त्यांच्या ताफ्यात सामिल झालेले दुसरे वाहन होते.
पोलिसांनी या रॅलीला प्रतिबंध केला होता १०० च्या वर लोक सामिल होऊ नयेत अशी अटही घातली होती. तसेच जगनमोहन रेड्डी यांच्या वाहनाबरोबर इतर तिन वाहनांनाच परवानगी दिली होती. तसेच मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात केला होता. पण रेड्डी यांच्या या रॅलीत हजारो लोक व मोठ्या प्रमाणात वाहनेही सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.