भाजप संघटनेत आता ‘महिलाराज’, स्मृती इराणी होणार राष्ट्रीय अध्यक्ष?

स्मृती इराणी ( संग्रहित छायाचित्र)
स्मृती इराणी ( संग्रहित छायाचित्र)

[author title="ताजेश काळे" image="http://"][/author]

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात जोरदार फटका बसल्यामुळे या दोन्ही राज्यांत 'डॅमेज कंट्रोल' करण्याचे काम सुरू आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सध्याच्या कार्यकारिणीत बदल करून नव्या पदाधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. राज्य विधानसभा व लोकसभेत महिलांचे प्रतिनिधीत्व वाढविण्याबाबत भाजपमध्ये गंभीरतेने विचार सुरू आहे.

पक्ष संघटनेतही महिलांना अधिकार देण्याच्या उद्देशाने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर देखील पहिल्यांदाच एका महिलेची निवड केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेल्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपलेला आहे. नड्डा यांची रालोआ सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यामुळे नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी पक्षात जोरदार विचारमंथन सुरू आाहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत कशी करता येईल, यावर गांभीर्याने विचार केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोदी सरकारने गेल्यावर्षी संसदेच्या दोन्ही सभागृहात महिला विधेयक पारित केले होते. या विधेयकानुसार, राज्य विधीमंडळ आणि संसदेत महिलांचे प्रतिनिधीत्व एकूण संख्येच्या एक तृतीयांश इतकी वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांमध्ये अधिकाधिक महिलांना संधी दिली जाणार आहे. त्याची सुरूवात भाजपच्या पक्ष संघटनेतून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पारंपारिक अमेठी मतदारसंघात पराभव केला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत स्मृती इराणी यांना गांधी घराण्याचे विश्वासू सहकारी किशोरीलाल शर्मा यांच्याकडून मात खावी लागली. या पराभवाचा बदला घेण्यासाठी स्मृती इराणी यांना पक्ष संघटनेत महत्वाची जबाबदारी देण्याचा भाजपचा विचार आहे. इराणी यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यास पहिल्यांदाच एका महिलेला हा मान मिळू शकणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

पराभूत महिला नेत्यांना मिळणार महत्वपूर्ण जबाबदारी

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या खासदार महिलांना पक्ष संघटनेत आणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. स्मृती इराणी यांचा पराभव झाल्यानंतरही त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागणार होती. मात्र, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचा विचार सुरू असल्याने त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. महाराष्ट्रात माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, राज्यातील माजी मंत्री पकंजा मुंडे, माजी खासदार डॉ. हिना गावित आणि नवनीत राणा यांचा पराभव झाला असला तरीही आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या महिला नेत्यांना पक्ष संघटनेत महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news