

Inspiring honesty of Padma
चेन्नई : 'आता कोठे पूर्वीच्या काळासारखा प्रामाणिकपणा राहिला आहे?,' हा प्रश्न सर्वच क्षेत्रात अत्यंत सहजरित्या विचारला जातो. त्याचे कारणही तसेच आहे. अब्जावधी रुपयांचे घोटाळे, शुल्लक पैशांसाठी होणारे खून-हाणामार्या, आर्थिक लुबाडणुकीचे असंख्य प्रकरणे दररोज आपल्या कानावर आदळत असतात. त्यामुळेच प्रामाणिक आचरणाची व्यक्ती ही अधिकच आदरणीय होते. असचं काहीसे चेन्नईतील सफाई कर्मचारी पद्मा यांच्याबाबत झाले. रस्त्यावर पडलेले तब्बल ४५ लाख रुपयांचे दागिते परत करत त्यांनी अढळ प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे. पद्मा यांच्या प्रामाणिकपणाची चर्चा तामिळनाडूत सुरु असून खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना सन्मानित केले आहे.
चेन्नईतील सफाई कर्मचारी पद्मा नेहमीप्रमाणे चेन्नईच्या गजबजलेल्या 'टी नगर' भागात पद्मा झाडू मारत होत्या. कचरा साफ करता करता त्यांची नजर रस्त्याकडेला पडलेल्या एका पिशवीवर पडली. कुतूहलापोटी त्यांनी पिशवी उघडून पाहिली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पिशवीत सोन्याचे हार, बांगड्या आणि सोन्याची बिस्किटे लखलखत होती. सुमारे ४५ तोळे वजनाचे हे दागिने असून त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ४५ लाख रुपये आहे.
पदमा यांच्या मनात लोभाचा लवलेशही आला नाही. त्यांनी कोणाशीही चर्चा न करता थेट 'पाँडी बाजार' पोलीस स्टेशन गाठले आणि तो ऐवज पोलिसांच्या हवाली केला. तपासाअंती हे दागिने रमेश नावाच्या व्यक्तीचे असल्याचे निष्पन्न झाले, ज्यांनी दागिने हरवल्याची तक्रार आधीच नोंदवली होती. हक्काचे सोने परत मिळाल्यावर रमेश यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
दरम्यान, शासनाकडून सन्मान आणि कौतुकाची थाप पद्मा यांच्या या कार्याची दखल घेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी त्यांना बोलावून सन्मानित केले. "पद्मा यांच्यासारख्या व्यक्तीच समाजाची खरी ताकद आहेत," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांना १ लाख रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे, प्रामाणिकपणा हा पद्मा यांच्या कुटुंबाचा प्रामाणिकपणा हा संस्कार आहे. कोरोना लॉकडाउन काळात पदमा यांचे पती सुब्रमणि यांनाही दीड लाख रुपये सापडले होते, जे त्यांनी प्रामाणिकपणे पोलिसांना परत केले होते. अत्यंत सामान्य जीवन कंठणाऱ्या या दांपत्याने पैशांपेक्षा 'इमानदारी' मोठी असल्याचे सिद्ध केले आहे.