

पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली -
शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात १ ऑक्टोबर (उद्या) ही नवी तारीख देण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी कधी होते, याकडे राजकीय पक्षांसह राज्यातील जनतेची नजर आहे. सर्वोच्च न्यायालयात सप्टेंबर महिन्यात हे प्रकरण ८ दिवस सूचीबद्ध करण्यात आले होते. मात्र, एकाही दिवशी यावर सुनावणी होऊ शकली नाही. आता या प्रकऱणाला सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सूचीबद्ध केले आहे. मात्र, त्यादिवशीही सुनावणी होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे 'दै. पुढारी'शी बोलताना म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण मंगळवारी, १ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर क्रमांक २५ आणि २५.१ मध्ये सूचीबद्ध केले आहे. १ ऑक्टोबरलाही हे प्रकरण सुनावणीला येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी व्हावी, असे वाटत असेल तर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने हे प्रकरण न्यायालयासमोर नमूद केले पाहिजे मात्र तसे प्रयत्न सप्टेंबर महिन्यात तरी झाले नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणात ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अर्ज नमुद केला होता. यामध्ये अजित पवार यांना देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हाऐवजी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर नवे चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणावर सुनावणी करत असेलेले न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्यासमोर हे प्रकरण नमुद करण्यात आले आहे. या अर्जावर १ ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर महिन्यात बराच कालावधी हा सुट्टयांचा आहे. २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, ५ ते १२ ऑक्टोबर दसरा आणि त्यानंतर २६ ऑक्टोबर तो ३ नोव्हेंबर दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. सरन्यायाधीश १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.