आमदार अपात्रता प्रकरण ८ दिवस न्यायालयाच्या पटलावर, तरीही सुनावणी नाहीच

प्रकऱण आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सूचीबद्ध
Shiv Sena, NCP, MLA disqualification case
File Photo
Published on
Updated on

नवी दिल्‍ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणाची सुनावणी कधी होते, याकडे राजकीय पक्षांसह राज्यातील जनतेची नजर आहे. सर्वोच्च न्यायालयात सप्टेंबर महिन्यात हे प्रकरण ८ दिवस सूचीबद्ध करण्यात आले. मात्र, एकाही दिवशी यावर सुनावणी होऊ शकली नाही. या प्रकरणाला तारीख पे तारखी मिळत असल्याचे दिसत आहे. आता या प्रकऱणाला सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सूचीबद्ध केले आहे. मात्र, त्यादिवशीही इतर प्रकरणे अगोदर न्यायालयासमोर असल्याने सुनावणी होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

१ ऑक्टोबरला सुनावणीची शक्यता कमीच

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाती वकील सिद्धार्थ शिंदे 'दै. पुढारी'शी बोलताना म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण मंगळवारी, १ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर क्रमांक २५ आणि २५.१ मध्ये सूचीबद्ध केले आहे. या प्रकरणा अगोदर न्यायालयासमोर इतर प्रकरणे सुनावणीसाठी असल्याने १ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता कमीच असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबईला भेट देऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होऊ शकतात. अशा परिस्थितीत आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल निवडणुकीच्या अगोदर येईल की नाही? असा प्रश्न पडत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीसह शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात या दोन्ही आमदार अपात्रता प्रकरणांची सुनावणी एकाच वेळी घ्यायची, असे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले होते. त्यानुसार गेले काही दिवस दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या तारखा एकत्र पडत आहेत. मात्र यावर सुनावणी होऊ शकलेली नाही. दरम्यान, या प्रकरणाला आधी ऑक्टोबर महिन्यातील तारीख देण्यात आली होती. मात्र एका आठवड्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्येच तारीख देण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात आठ दिवस हे प्रकरण न्यायालयाच्या पटलावर होते. मात्र, सुनावणी होऊ शकली नाही.

शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीचे प्रकरणही १ ऑक्टोबर रोजी सूचीबद्ध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणात ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अर्ज नमुद केला होता. यामध्ये अजित पवार यांना देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हाऐवजी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर नवे चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणावर सुनावणी करत असेलेले न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्यासमोर हे प्रकरण नमुद करण्यात आले आहे. या अर्जावर १ ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news