

Divorce Case : पत्नीचे वैवाहिक घरातून वारंवार बाहेर राहणे. तसेच पती व सासरच्या मंडळींविरुद्ध वारंवार तक्रारी दाखल करणे ही क्रूरता आहे, असे निरीक्षण नोंदवत दिल्ली उच्च न्यायालयाने पतीेशे घटस्फोटाला मंजुरी दिली.
पत्नीने स्वत:ला वैवाहिक जबाबदार्यांपासून स्वत:ला दूर ठेवले. तसेच लैंगिक संबंधानाही नकार दिला. त्यामुळे हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ (१) अ) अंतर्गत क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मंजूर करण्यात यावी, अशी याचिका पतीने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती.
पतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल क्षत्रपाल आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने स्पष्ट केले की, वैवाहिक सहवासापासून सतत वंचित ठेवणे हे क्रूरतेचे एक गंभीर स्वरूप आहे. पत्नीने पतीच्या संमतीशिवाय वैवाहिक जबाबदाऱ्यांपासून स्वतःला दूर ठेवले आणि लैंगिक संबंधांना नकार दिला. वैवाहिक सहवास आणि वैवाहिक कर्तव्ये पार पाडणे हा विवाहाचा पाया आहे. त्यांचा सततचा नकार केवळ पती-पत्नीच्या संबंधांमध्ये दरी निर्माण करत नाही, तर न्यायालयीन हस्तक्षेपाची हमी देणारी क्रूरता देखील आहे.'
पत्नीने पतीविरुद्ध दाखल केलेल्या तीनही एफआयआर त्याच्या घटस्फोटाच्या याचिकेनंतरच दाखल करण्यात आले, याकडे उच्च न्यायालयाने लक्ष वेधले.कार्यवाहीनंतर दाखल करण्यात आलेल्या तक्रारींच्या वेळेकडे दुर्लक्ष करता येणार नाही,' असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, 'या प्रकरणात पत्नीने वैवाहिक संबंधांना दीर्घकाळ नकार दिला, वारंवार घरातून बाहेर राहिली आणि अनेक तक्रारी दाखल केल्या. या सर्व गोष्टी मानसिक त्रास देणाऱ्या असून या कृती हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ (१) (i-अ) अंतर्गत 'क्रूरते'च्या श्रेणीत येतात. अशाप्रकारे वैवाहिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वैवाहिक संबंधांचा पायाच ढासळला आहे. पतीने सतत प्रयत्न करूनही पत्नीने त्याला मुलाला भेटू दिले नाही. मुलाला जाणूनबुजून वडिलांपासून दूर ठेवणे हा मानसिक क्रूरतेचा एक गंभीर प्रकार असल्याचे न्यायालयाने म्हटले. 'मुलाचा वैवाहिक कलहाचे साधन म्हणून वापर करणे, हे केवळ प्रभावित पालकालाच नाही, तर मुलाच्या भावनिक आरोग्यालाही हानी पोहोचवते. त्यामुळे कौटुंबिक सौहार्दावरच परिणाम होतो,' असेही न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले आहे.
,