

पुढारी ऑनलाईन डेस्क : रस्त्यावर सिग्नलला डान्सचा रिल बनवण्याचा बायकोचा हट्ट पोलीस पतीच्या चांगलाच अंगलट आला आहे. चंदीगडमधील सेक्टर २० येथील गुरुद्वारा चौकात रस्त्याच्या मधोमध वाहतूक थांबवून पत्नीने रील बनवल्याने चंदीगड पोलिसात तैनात पतीला निलंबित करण्यात आले. तसेच तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अजय कुंडू असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.
निलंबित कॉन्स्टेबल अजय कुंडू सेक्टर-२० पोलीस कॉलनीत पत्नी ज्योती हिच्यासह राहतात. २० मार्च रोजी कुंडू यांच्या पत्नी ज्योती आणि तिची ननंद पूजा या हनुमान मंदिरात गेल्या होत्या. मंदिरातून येत असताना गुरुद्वारा चौकातील सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर ज्योती यांनी डान्सचा रिल बनवला. सोबत असलेल्या पूजा हिने हा व्हिडिओ शूट केला. या घटनेमुळे सिग्लनला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्योती हायरणवी गाण्यावर नृत्य करत आहे, पण तिला वाहतूक जाम होण्याचं काहीच भान राहिलं नव्हतं.
हेड कॉन्स्टेबल जसबीर यांच्या तक्रारीवरून ज्योती आणि पूजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी सांगितले की, या महिला नृत्य करत असताना रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. या कृत्यामुळे रस्ता अपघात देखील होऊ शकला असता. या घटनेनंतर चंदीगड पोलिसांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या कृत्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे रस्ते अपघात होऊ शकतात. जर कोणतीही महिला किंवा पुरूष सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्याच्या मधोमध रील बनवताना आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चंदीगड पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच कॉन्स्टेबल अजय कुंडू यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरून पत्नीचा व्हिडिओ शेअर केल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले.